बदलापूर: खगोलशास्त्राची आवड जोपासणाऱ्या आणि जनमानसात विज्ञानाची गोडी निर्माण करू इच्छिणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील खगोलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहापूर जवळील साकडबाव येथे जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक तारांगण आणि चार मोठ्या दुर्बिणींनी सज्ज असलेली वेधशाळा उभारण्यात आली आहे.

‘सॅपो’ (SAPO) असे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नाव असून, निलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या बंधूंनी आपल्या साडेतीन एकर जागेत हा प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन रविवार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण आणि शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल.

ठाकूर बंधूंनी उभारलेला हा प्रकल्प केवळ मनोरंजनाचे साधन नसून खगोलविज्ञानाचा एक उत्तम शैक्षणिक केंद्र ठरणार आहे. येथे ५६ आसनांची व्यवस्था असलेले डोम थिएटर आहे. यामध्ये अर्धा ते एक तासाचे खगोलशास्त्रीय माहिती देणारे कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये पाहता येतील. तसेच येथे प्रगत वेधशाळा उभारली असून या वेधशाळेत १६, १४, १० आणि ६ इंच व्यासाच्या चार मोठ्या आरशाच्या दुर्बिणी आहेत. विशेष म्हणजे, आकाश निरीक्षणासाठी वेधशाळेचे छप्पर एका बटणावर स्वयंचलितपणे मागे सरकते.

दिवसा आणि रात्रीही निरीक्षण: सोलर फिल्टर असलेल्या दुर्बिणीतून दिवसा सूर्य, सौरडाग आणि सौरज्वाला पाहता येतात. रात्रीच्या वेळी गुरूचे चंद्र, शनीची वलये आणि देवयानी सारख्या दीर्घिकांचे स्पष्ट दर्शन घडते. दोन दुर्बिणी संगणकाशी जोडलेल्या असून त्याद्वारे अवकाशातील दृश्यांचे छायाचित्रणही करता येते.

पर्यटकांसाठी विशेष सोयीसुविधा

खगोलप्रेमींना रात्रीचा आनंद घेता यावा यासाठी येथे राहण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. राहण्याची सोय: स्वतंत्र खोल्या आणि मोठ्या गटांसाठी ‘डॉरमेटरी’ उपलब्ध आहे. प्रकल्पात प्रदर्शन हॉल, सेल्फी पॉईंट्स आणि खवय्यांसाठी उपहारगृहाची सोय आहे. तसेच, आकाशदर्शन घडवण्यासाठी तज्ज्ञ स्वयंसेवकही उपस्थित राहणार आहेत.

भेट देण्यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक

शहापूरमधील साकडबाव येथे जुनोनी-कोथरा रोडवर, पोकलेवाडी नजीक हा प्रकल्प वसलेला आहे. ज्या खगोलप्रेमींना या प्रकल्पाला भेट द्यायची आहे, त्यांनी ७५०६२६६२६६ किंवा ७५०६३२२३२२ या क्रमांकावर संपर्क साधून आपली नावे नोंदवणे अनिवार्य आहे.

ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच खासगी तारांगण असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण असून, खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.