ठाणे – शहापूर तालुक्यात यंदाच्या आंबा हंगामावर मोठे संकट ओढावले असून सततचे ढगाळ वातावरण, वाढती उष्णता आणि बदलते हवामान यामुळे आंबा झाडांवरील फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. प्राथमिक पाहणीत सुमारे ७० टक्के आंबा पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, यामुळे बागायतदारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तालुक्यातील एकूण ५७६ हेक्टर क्षेत्रावरील उत्पादनक्षम आंबा बागांना या परिस्थितीचा थेट फटका बसला आहे.

शहापूर तालुक्यातील डोंगराळ आणि ग्रामीण भागात आंबा शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागातील शेतकरी मोठा खर्च करून बागांची निगा राखतात, कीडनियंत्रण, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनावर भर देतात. मात्र, यंदा हवामान बदलामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असून, त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य आधार असलेला आंबा हंगाम धोक्यात आला आहे. फळगळ अशीच सुरू राहिल्यास केवळ उत्पादन घटणार नाही, तर बाजारात पुरवठा कमी होऊन दरांवरही परिणाम होईल.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली असून कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संयुक्त पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीच्या आधारे नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासन स्तरावर या अहवालावर कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

यंदा आंबा पिकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर मोहोर आला होता आणि उत्पादन चांगले मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे ही अपेक्षा धुळीस मिळाल्याचे चित्र दिसत आहे. सध्या दिवसेंदिवस वाढणारे तापमान आणि त्यासोबत सतत राहणारे ढगाळ वातावरण यामुळे आंबा झाडांच्या वाढीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. विशेषतः फळधारणेच्या टप्प्यावर या बदलांचा गंभीर परिणाम झाला असून झाडांवरील लहान तसेच मध्यम आकाराची फळे मोठ्या प्रमाणात गळून पडत आहेत. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृषी विभागीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त पाहणीनंतर शासनाला अहवाल पाठवण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ७० टक्के नुकसान झाले आहे. शासन स्तरावरून पुढील कार्यवाही सुरू आहे. – रामेश्वर पाचे, कृषी अधिकारी, ठाणे</strong>

यावर्षी आंब्याला चांगला मोहोर आला होता. उत्पादनही चांगले मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान आणि वाढती उष्णता यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. झाडांवरील लहान-मोठी फळे गळून पडत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून मदत द्यावी. – बबन हरणे, शेतकरी