शहापूर : दिव्यांग व्यक्तींना केवळ मदतीचा आधार न देता त्यांना रोजगार, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनात स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत शहापूर तालुक्यातील २५ दिव्यांग लाभार्थ्यांना दुचाकी वाटप करण्यात आले. यामध्ये सहा दिव्यांग महिलांचाही समावेश आहे. शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.एच. राठोड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना दुचाकीचे वितरण करण्यात आले.

ठाणे जिल्हा परिषदेच्या पाच टक्के दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना रोजगार, स्वयंरोजगार तसेच दैनंदिन कामकाजासाठी प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी तीनचाकी वाहन, स्कुटी किंवा ई-स्कुटी खरेदीसाठी अनुदान देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात येते. या योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसणे ही महत्त्वाची अट आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला.

बिरवाडी, आसनगाव, किन्हवली, शिदपाडा, सरलांबे, साठगाव, शेई, वालशेत, डोळखांब, सोगाव, उंभ्रई, शेणवे, खरीवली, धोबीपाडा आदी गावांतील पात्र लाभार्थ्यांना स्कुटीचे वितरण करण्यात आले. वाहन उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांचा दैनंदिन प्रवास सुकर होण्याबरोबरच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेणेही अधिक सुलभ होणार आहे. दिव्यांग व्यक्तींना केवळ आर्थिक मदत देण्यापेक्षा त्यांच्या हालचाली, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढवून त्यांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.या कार्यक्रमास मेघराज निमसे, अरुण विशे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.