शहापूर : आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून आश्रमशाळांमध्ये विविध उपाययोजना केल्या जात असताना शहापूरमधील येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तब्बल २१ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वयंपाक्याचा मदतनीस म्हणून काम करणाऱ्या गणपत गवळी याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षा यंत्रणा नेमकी करते काय, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे.

विद्यार्थिनी जेवणाचे ताट घेऊन धुण्यासाठी जात असताना गवळी याने त्यांच्या हाताला, दंडाला, पाठीला तसेच शरीराच्या विविध भागांना हात लावून त्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असून, २१ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीरबाब म्हणजे, गवळी याच्यावर यापूर्वीही विनयभंगाच्या प्रकारावरून निलंबनाची कारवाई झाल्याचे समोर आले आहे. असे असताना तो पुन्हा आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या संपर्कात कसा आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आश्रमशाळेत निवासी पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची असताना असा प्रकार घडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आदिवासी विकास विभागाने या प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता पूर्वीच्या निलंबनाची पार्श्वभूमी, संबंधित व्यक्तीला पुन्हा कामावर ठेवण्याचा निर्णय आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. या प्रकरणाचा तपास शहापूर पोलीस करीत आहेत.