कल्याण – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासी, डोंगराळ, दुर्गम भागातील पळशीन गावातील प्रशांत काशिनाथ सापळे यांनी खडतर परिस्थितीवर मात करत, मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेत रिझर्व्ह बँकेत साहाय्यक व्यवस्थापक पदापर्यंत झेप घेतली आहे. डोंगराळ दुर्गम भागात राहून अर्थविषयक विषयात शिक्षण घेऊन, प्रगती करून सपकाळ यांनी हे यश संपादन केल्याने विविध स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

शहापूर तालुक्यातील पळशीन या डोंंगराळ दुर्गम गावातील प्रशांत सापळे हे मूळ रहिवासी आहेत. पळशीन गाव परिसरात उच्चप्रतीच्या शिक्षणाच्या संधी नसताना त्यांनी स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद, स्थानिक हायस्कूलमध्ये आपले दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. उपजत हुशार असल्याने त्यांनी दहावीनंतरचाही प्रवास कष्ट, मेहनत घेऊन आपल्या बुध्दिमतेच्या जोरावर पूर्ण केला.

आदिवासी, डोंगराळ, दुर्गम भागातून येणाऱ्या तरूणांमध्ये एक बुजरेपणाची सवय असते. आपणास बाहेरील उच्चपदस्थ यंत्रणा स्वीकारेल की नाही अशी धाकधूक मनात असते. या सर्व बाह्य परिस्थितीवर मात करून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशांत सापळे यांनी काही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. वाणिज्य आस्थापनेत आपण नोकरी करायची आणि आपल्या मेहनतीच्या बळावर उच्चपदस्थानी पोहचायचे अशी महत्वाकांक्षा बाळगून प्रशांत सापळे वाटचाल करत होते.

आपल्या ध्येय, कष्टाच्या बळावर सापळे यांनी रिझर्व्ह बँकेत नोकरी मिळवली. आपल्या प्रशासकीय कामाच्या कौशल्यातून नोकरीच्या चार वर्षाच्या कालावधीत आता त्यांना साहाय्यक व्यवस्थापक पदावर बढती मिळाली आहे.

समर्पित भावाने काम करणे हे त्यांंचे प्रशासकीय कामाचे सूत्र आहे. दरवर्षीचा आपल्या कार्यमूल्यांकन अहवालात ते अव्वल स्थानी राहिले आहेत. या कामाची दखल घेऊन आणि त्यांच्या प्रशासकीय चमकदार कामगिरीमुळे प्रशांत सापळे यांना उल्लेखनीय कामगिरीचा सुवर्णपदकाचा मान मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय कार्यालय स्तरावरील दक्षता विकास आणि अंमलबजावणी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रशांत यांना विशेष सन्मान प्राप्त झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या कोषपालांच्या हस्ते प्रशासकीय कामातील निष्ठा, अचूकता आणि तत्परतेबद्दल त्यांना गट श्रेणी अंतर्गत सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

शहापूर तालुक्यातील दुर्गम खेडेगावात जन्म घेऊन, गावातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेऊन मिळालेले मार्गदर्शन आणि स्वसामर्थ्याने प्रशांत सापळे यांनी देशातील सर्वोच्च मध्यवर्ती बँकेत उत्तुंग कामगिरी केल्याने ग्रामीण भागातील तरूण वर्गाला हा मोठा आदर्श आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आपण कष्ट, मेहनत घेऊन आपण आपल्या बुध्दीकौशल्याने शहरी, ग्रामीण असा भेद न ठेवता उच्चस्थानी झेप घेऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे चरीव भागातील सामाजिक कार्यकर्ते वसंत पानसरे यांनी सांगितले.