शहापूर : आसनगाव येथील रेल्वे पुलाखालून वाहणाऱ्या भारंगी नदीत तरुण बुडल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. सार्थक कोळी (१७) असे नदीत बुडालेल्या तरुणाचे नाव असून तो कल्याण येथे वास्तव्यास आहे. डिप्लोमाच्या दुसऱ्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी तो आसनगाव येथील जोंधळे महाविद्यालयात त्याच्या मित्रांसोबत आला होता. जीवरक्षक दल, स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू असल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले.
डिप्लोमाच्या दुसऱ्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी कल्याण येथून सार्थक त्याच्या मित्रांसोबत आसनगाव येथील जोंधळे महाविद्यालयात आला होता. प्रवेश प्रक्रियेसाठी अवधी असल्याने आसनगाव येथील रेल्वे पुलाखाली भारंगी नदी जवळ सार्थक मित्रांसोबत फिरायला गेला. त्यांनी नदीत पोहण्याचा निर्णय घेतला. पावसाचा जोर असल्याने भारंगी नदी तुडुंब भरून वाहत होती. या दरम्यान सार्थकला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडाला. बुधवारी दुपारी घटना घडली असून मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला.
यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी जीव रक्षक पथकासह दाखल होऊन शोधकार्य सुरु केले. बुधवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. पावसाचा जोर आणि अंधार झाल्याने शोध मोहीम गुरुवारी सकाळी सुरू करण्यात आली. गुरुवारी दुपारनंतही त्याचा शोध लागू शकला नव्हता असे पोलिसांनी सांगितले.