शहापूर : शेतकऱ्यांच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी शहापूर तालुक्यातील लवले येथे शेतात उतरून भातकापणी व झोडणीचा अनुभव घेतला. हातात विळा घेऊन त्यांनी शेतकऱ्यांसोबत काम केल्याने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या दौऱ्यात त्यांनी कृषी उपक्रमांसह विविध विकासकामांचीही पाहणी केली.
शहापूर तालुक्यातील विकासकामांची पाहणी आणि कृषी विभागाच्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी अजिंक्य पवार यांनी तालुक्याला भेट दिली. कृषी विभाग आणि शहापूर पंचायत समितीच्या वतीने मौजे शेणवे येथे आयोजित शेतकरी शिबिरात त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समितीच्या उपकर फंडातून लाभार्थींनी खरेदी केलेल्या ताडपत्रींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करण्यात आली. यानंतर मौजे लवले येथे त्यांनी वरई व भातपिकांची पाहणी केली. भात पीक पर्यवेक्षणादरम्यान पवार यांनी शेतकऱ्यांसोबत भातकापणी केली. त्याचबरोबर भात झोडणीची प्रक्रियाही अनुभवली. वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रत्यक्ष शेतात उतरून शेतीच्या कामात सहभाग घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला.
या दौऱ्यात लवले ग्रामपंचायत हद्दीतील घरकुल योजनांची कामे, आरोग्य उपकेंद्र व अंगणवाडीच्या बांधकामाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर ठुणे ग्रामपंचायतीला भेट देऊन त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. या दौऱ्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाबू राठोड, कृषी अधिकारी विलास झुंजारराव, विस्तार अधिकारी (कृषी) दिनेश घोलप, सचिन गंगावणे, ललित बडगुजर, ग्रामविकास अधिकारी योगेश हरड यांच्यासह ग्रामीण गृहनिर्माण अभियंता व इतर कर्मचारी उपस्थित होते.
