ठाणे जिल्ह्य़ातील भविष्यातील शहरे असलेल्या शहापूर आणि मुरबाडमध्ये नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत अनुक्रमे शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी निर्विवाद यश मिळविले आहे.

शहापूरमध्ये १७ पैकी ११ जागी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले, तर मुरबाडमध्ये भाजपने तितकेच निर्विवाद यश मिळवीत १७ पैकी ११ जागा मिळविल्या आहेत. मुरबाडमध्ये एक भाजप पुरस्कृत उमेदवार निवडून आल्याने त्यांचे संख्याबळ १२ आहे.

शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. मात्र आठ जागा मिळविणाऱ्या काँग्रेसला एकही जागा मिळविता आली नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. भोपटराव यांना अवघे एक मत मिळाले. मुरबाडमध्ये स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने एकहाती सत्ता मिळवली. शिवसेनेला तीन तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले.