डोंबिवली : रस्ते, विविध विकास प्रकल्पांसाठी झाडे तोडली जातात. यामुळे शहरातील वनराई नष्ट होत आहे. अशाही परिस्थितीत अस्तित्वातील झाडे टिकली पाहिजेत. त्यांचे जतन केले पाहिजे. उपलब्ध जागेत शाश्वत जंगल विकसित करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे, या विचारातून डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर भागात नानासाहेब पुणतांबेतकर न्यासतर्फे शैलगंगा शहरी वन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिलापनगरमधील या जागेत शाश्वत पध्दतीचे जंगल विकसित करून शास्त्रीय पध्दतीने त्याचे जतन केले जाणार आहे. या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमासाठी केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर आणि इव्हाॅनिक कॅटलिस्टस इंडिया प्रायव्हेट या संस्थांनी सामाजिक दायित्व निधी देण्याची तयारी केली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील निसर्गप्रेमी नागरिक, पर्यावरणस्नेही संस्था यांच्या पुढाकाराने ही हरित चळवळ पुढे नेण्याचा मानस आयोजक संस्थेचे डाॅ. सुनील पुणतांबेकर यांनी व्यक्त केला आहे.
मुंंबईतील निसर्ग उद्यानचे माजी संचालक अविनाश कुबल या शहरी वन प्रकल्पासाठी प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. या प्रकल्पात झाडे लावल्यानंतर प्रत्येक झाड जगविण्याची कोणाची इच्छा असेल तर त्या नागरिकाला वृक्ष पालक म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे. एकदा वृक्ष पालक एखाद्या व्यक्तिने जबाबदारी घेतल्यानंतर ते मोठे होईपर्यंत त्याची पूर्ण निगा संबंधित व्यक्तिने घ्यायची आहे. अशाप्रकारची वृक्ष पालक योजनेची घोषणा होताच निसर्गप्रेमी डाॅक्टर नितीन भट यांनी या योजनेत सहभागी होऊन वृक्ष पालक म्हणून स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकल्पाला एमआयडीसीकडून कुंपण घालून देण्यात येणार आहे. या शहरी वन प्रकल्प शुभारंभाच्या कार्यक्रमाला एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता भूषण हर्षे, कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांच्यावतीने उपअभियंता दरेकर आणि गोगटे उपस्थित होते. डोंबिवलीत शहरी भागात अशाप्रकारचे शहरी वन प्रकल्प उभारण्याचा हा पहिलाच प्रकल्प आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच याठिकाणी रोपांची लागवड करण्याचे नियोजन आहे. आणि जागतिक पर्यावरण दिनी नागरिकांच्या उपस्थितीत काही रोपे लावण्यात येणार आहेत. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी या उपक्रमात अधिक संख्येने सहभागी होऊन शहर पर्यावरणस्नेही ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रकल्प समन्वयक अविनाश कुबल यांनी केले आहे.
अशाप्रकारचा एक प्रकल्प डोंबिवली पश्चिमेत रेल्वे मैदान जागेत सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे करत आहेत. साहित्यिक, लेखक, पर्यावरणप्रेमी लोको पायलट गणेश कुलकर्णी आणि सहकारी डोंबिवली पश्चिमेत रेल्वे मैदान भागात शहरी वन प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.