ठाणे – अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत चर्चा होऊ लागली आहे. परंतू, शरद पवार यांच्या राष्ट्रावदीकडून जरी ही चर्चा होत असली तरी, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलिनिकरणाचा मुद्दा फेटाळला जात आहे. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी विलिनिकरणावर अनेक नेत्यांकडून वक्तव्य केले जात आहे. आता, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पत्रकारांना प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाल्याने राज्यभर शोक व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांकडून शोक सभांचे आयोजन करण्याबरोबरच कार्यालयात त्यांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात येत आहेत. अशाचप्रकारे ठाणे येथील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कार्यालयात अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या होत्या.

यावेळी पक्ष विभाजनानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला, माजी खासदार आनंद परांजपे हे तिघे एकत्र येऊन त्यांचे मनोमिलन झाल्याचे चित्र दिसून आले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार यांच्या निधणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा रंगली आहे. यासंदर्भात अजित पावर आणि शरद पवार यांची बैठक पार पडली होती. याचा व्हिडीओ देखील प्रसारित होत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या विलिनिकरणाबाबत राजकीय वर्तूळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहे.

यासंदर्भात, पत्रकारांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी दोन्ही पक्षाचे विलिनिकरण होणार होते हे २००० टक्के सत्य आहे असे वक्तव्य केले. ते म्हणाले, विलिनीकरणा बाबतीत वरच्या पातळीवरचा विषय आहे. मी यावर बोलण माझ्या स्वभावात बसत नाही. परंतू, विलिनीकरण होणार होतं हे २०००% सत्य आहे, असे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात बोलताना केले आहे.

अजित पवार यांचे निधन महाराष्ट्रासाठी नुकसान

अजित पवार यांचे निधन म्हणजे महाराष्ट्रासाठी खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या इतका तडकाफडकी नेता मिळणे नाही. निर्णय घेणारा नेता त्या निर्णयांची अंमलबजावणी करणारा नेता मी तरी महाराष्ट्रात ४० वर्षात पाहिलेला नाही. प्रशासनावर जबरदस्त पखड असलेला नेता होते ते फायलींचा निपटारा इतक्या लवकर करायचे की त्यांच्या काळात फाईली थांबल्या आहेत असे मंत्रालयात कधी घडलंच नाही, असे मत आमदार आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केले.