बदलापूरः मुरबाड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेलेले आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्याविरूद्ध निवडणुक लढवलेले सुभाष गोटीराम पवार यांनी गुरूवारी किसन कथोरे यांच्याच पुढाकाराने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
ठाणे जिल्ह्यात मुरबाड मतदारसंघात एकेकाळी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. सुरूवातीला शांताराम घोलप आणि पुढे गोटीराम पवार यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिला. गोटीराम पवार हे चार टर्म आमदार होते. त्यानंतर त्यांचे पुत्र सुभाष पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
काही वर्षांपूर्वी सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना शिवसेनेने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही दिले होते. त्यांच्याकडे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख पदही होते. मात्र गेल्या वर्षातल्या विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपला गेल्याने इच्छुक असलेले सुभाष पवार यांची कोंडी झाली. पवार यांनी महाविकास आघाडीची दारे यापूर्वीच ठोठावली होती. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे गेली. त्यामुळे पवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात गेले.
विधानसभा निवडणुकीत मुरबाड मतदारसंघात भाजपच्या किसन कथोरे यांनी सुभाष पवार यांना पराभवाची धुळ चारली. त्यावेळी दोघांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती. त्यावेळी पवार आणि कथोरे समर्थकांमध्येही खालच्या थरावर टीका केली जात होती. एकमेकांवर घोटाळ्यापासून सर्वच विषयांवर आरोप करण्यात आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सुभाष पवार पुन्हा शिवसेनेत परतणार अशी शक्यता होती.
मात्र त्याचवेळी सुभाष पवार भाजपात प्रवेश करतील अशी घोषणाच आमदार किसन कथोरे यांनी गेल्याच आठवड्यात केली होती. त्यानुसार गुरूवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सुभाष पवार यांनी भाजपात प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचा तोंडावर पवार यांचा भाजपातील प्रवेश हा महत्वाचा मानला जातो. सुभाष पवार यांना भाजपात काय जबाबदारी देतात आणि त्यांना कोणते आश्वासन दिले हेही येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेलाही धक्का
सुभाष पवार यांच्या रूपाने मुरबाड तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढली होती. आता सुभाष पवार भाजपात गेल्याने ते शिवसेनेविरूद्ध मैदानात उतरण्याची शक्यता आहे. पवार यांच्यासह अनेक माजी सभापती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती सदस्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना कुणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपला मजबूत करण्याचे काम करणार
विविध विकासकामांना गती देण्यासाठी भाजपात प्रवेश केला. अनेक वर्षे भाजप विरोधात काम केले. निवडणुकही लढलो. पण परिसराचा विकास करण्यासाठी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. भाजपला मजबूत करण्याचे काम करणार, अशा भावना यावेळी सुभाष पवार यांनी व्यक्त केल्या.
