scorecardresearch

सर्वोच्च न्यायालयातील Thackeray vs Shinde सत्तासंघर्ष कधी निकाली निघेल? शरद पवारांनी थेट सांगितलं, “यासाठी काही इतके…”

सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील अद्यापही निकाल न आल्याने राजकीय पेच कायम आहे.

सर्वोच्च न्यायालयातील Thackeray vs Shinde सत्तासंघर्ष कधी निकाली निघेल? शरद पवारांनी थेट सांगितलं, “यासाठी काही इतके…”
ठाण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केलं विधान

सर्वोच्च न्यायालयामध्ये बंडखोर शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरेंदरम्यान सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाचा निकाल पाच वर्ष लागण्याची शक्यता नाही असं विधान शिंदे समर्थक आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे. या विधानावरुन तर्क वितर्क लढवले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये गोगावलेंचा हा दावा खोडून काढला. इतकच नाही तर पवार यांनी थेट सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागेल यासंदर्भातील भाकितही व्यक्त केलं आहे.

नक्की पाहा >> India Beat Pakistan: हार्दिक पंड्याने विजयी षटकार लगावताच शरद पवारांनी…; सेलिब्रेशनचा खास Video सुप्रिया सुळेंनी केला शेअर

सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षावरील अद्यापही निकाल न आल्याने राजकीय पेच कायम आहे. सत्तासंघर्षांबाबतच्या याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे लवकर सुनावणी व्हावी, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सुनावणीबाबतची अनिश्चितता कायम असल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी रत्नागिरीमधील जाहीर सभेत सत्तासंघर्षासंदर्भात विधान केलं आहे. “आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत असं ते म्हणालेत. धनुष्यबाण आमचाच आहे, ७ तारखेला आम्ही तुम्हाला दाखवतो. या लोकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. अपात्र होतील सरकार कोसळेल याची वाट पाह होतो. पण मी आज सांगतो, घटनापीठाकडे गेलेल्या तक्रारीवर चार ते पाच वर्ष निकाल येणार नाही. यानंतर २०२४ ची निवडणूक आपण जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ,” असं भरत गोगावले म्हणाले.

पवार या विधानावर काय म्हणाले?
ठाण्यातील राष्ट्रवादीच्या आठावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पवार यांना गोगावलेंच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. “पुढील पाच वर्ष न्यायलयामधील पेचप्रसंग सुटणार नाही असं भाकित भरत गोगावलेंनी केलेलं आहे,” असं म्हणत पत्रकारांनी प्रश्न विचारला. तसेच गोगावले हे शिंदे गटाचे आमदार असल्याचा संदर्भही पवारांना पत्रकारांनी दिला. त्यावर पवारांनी मोजक्या शब्दामध्ये. “त्यांचा सुसंवाद फारच चांगला दिसतोय. इतकी जवळीक न्याय संस्थेसंदर्भात मी कधी ऐकली नव्हती. पण याचा अर्थ काहीतरी दिसतंय,” असं उत्तर दिलं.

निकालासंदर्भात भाकित
गोगावलेंच्याच विधानावरुन पवारांना या सत्तासंघर्षाच्या निकाला चार ते पाच वर्ष लागतील असा दावा केला जातोय. यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पवारांनी, “मला काही फारसं वाटतं नाही. याच्यानंतर त्याच्या (खटल्याच्या) ज्या काही तारखा असतील त्या पुढील दोन-तीन तारखांमध्ये या प्रश्नाचा निकाल नक्की लागेल” असा विश्वास व्यक्त केला. तसेच, “यासाठी काही इतके वर्ष थांबायची गरज नाही. त्याला इतके महिने सुद्धा थांबायची गरज आहे असं मला वाटत नाही,” असंही पवार यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.