राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. ते बुधवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. अण्णा हजारे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर गंभीर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यामुळे व्यथित झालेल्या पवारांनी आपण अण्णा हजारे यांच्याविरुद्ध खटला भरण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगितले. त्यासाठी मी कायदेशीर सल्ला घेत असून अण्णा हजारे यांच्याविरुद्ध गुन्हेगारी आणि दिवाणी खटला दाखल करण्याचा माझा विचार आहे. अण्णा हजारे हे ज्येष्ठ समाजसेवक असले तरी त्यांनी कोणाविरूद्ध काहीही बोलणे हे योग्य नव्हे. यानिमित्ताने अण्णा हजारे यांनी स्वत:हून मला कायदेशीर लढाई लढण्याची संधी दिली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून याप्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांची चौकशी करण्याची मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. यासाठी अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात दोन दिवाणी आणि एक फौजदारी याचिका दाखल केल्या आहेत. बँकांकडून आर्थिक सहाय्य घेऊनही साखर कारखाने जाणीवपूर्वक डबघाईला आणण्यात आले आणि त्यानंतर ते कमी किंमतीमध्ये विकण्यात आले. या सर्व अनागोंदी कारभारामुळे राज्य सरकार, सहकार क्षेत्र आणि जनतेचे २५ हजार कोटींचे नुकसान झाले असा दावा अण्णा हजारेंनी केला आहे. सहकारी साखर कारखान्यांमधील या घोटाळ्यात शरद पवार, अजित पवार यांच्यासारख्या काही राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोपही हजारेंनी याचिकेत केला आहे. या घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी मागणी अण्णा हजारेंनी केली असून याचिकेत शरद पवार आणि अजित पवार यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. घोटाळ्याची सीबीाय चौकशी करण्याची अण्णा हजारेंची मागणी आहे. माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन या प्रकरणातील आकडेवारी मिळवल्याचे अण्णा हजारेंनी याचिकेत म्हटले आहे.