ठाणे : महापौर पदासाठी आरक्षित असलेल्या राखीव प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकाची निवड करण्याचा यापुर्वी नियम होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने १९९८ मध्ये दिलेल्या एका निकालानंतर या नियमात बदल करण्यात आला. त्याचाच फायदा शिवसेना (शिंदे गट) पक्षातर्फे महापौर पदाचा अर्ज दाखल करणाऱ्या शर्मिला पिंपळोलकर यांना फायदा झाला असून या बदललेल्या एका नियमामुळेच राखीव प्रभागातून निवडून आलेल्या नसतानाही त्यांची महापौर पदासाठी वर्णी लागली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काही महिन्यांपूर्वी प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. त्यात एकूण १३१ जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी ३, नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) ३५ आणि सर्वसाधारण ८४ जागांचा समावेश होता. महापालिका निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. विशेष म्हणजे ठाणे महापौर पदासाठी यंदा अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले. यानंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक जाहीर झाली. शिंदेच्या शिवसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणले असून, एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे संख्याबळ ७६ वर गेले आहे.
ठाणे महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ६६ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक आहे. त्यामुळे शिंदे सेनेचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. यातूनच राखीव प्रभागातून निवडून आलेल्या सात नगरसेवकांच्या नावाची चर्चा होती. यामध्ये पद्मा भगत, वनिता घोगरे, विमल भोईर, गणेश कांबळे, डॉ. दर्शना जानकर, आरती गायकवाड आणि दीपक जाधव यांचा समावेश होता. महापौर पदासाठी आरक्षित असलेल्या राखीव प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकाची निवड करण्याचा यापुर्वी नियम होता. यामुळे या नावांची चर्चा होत होती.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
महापौर पदासाठी आरक्षित असलेल्या राखीव प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकाची निवड करण्याचा यापुर्वी नियम होता. परंतु महापौर पद हे राखीव असल्यास (अध्यक्षपदासाठी) फक्त राखीव प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यानेच निवडणूकीला उभे राहिले पाहिजे असे नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने १९९८ मध्ये दिला होता. कासमभाई वि. चंदूभाई रजपूत, १९९८ ऑल इंडिया रिपोर्टर (सुप्रीम कोर्ट) – ८५० या खटल्यात हा निकाल देण्यात आला. या निकालनंतर नियमात बदल झाला.
नियमात बदल अन् फायदा
ठाणे महापालिकेचे महापौर पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडून आलेल्या पद्मा भगत, वनिता घोगरे, विमल भोईर, गणेश कांबळे, डॉ. दर्शना जानकर, आरती गायकवाड आणि दीपक जाधव यांच्या नावाची चर्चा होती. यापैकी कुणाची तरी निवड होईल, असे म्हटले जात होते. परंतु बदलत्या नियमाचा आधार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी येथील सर्वसाधारण प्रभागातून निवडणूक लढवलेल्या शर्मिला पिंपोळकर यांना महापौर पदाची उमेदवारी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या बदललेल्या निर्णयाचा फायदा त्यांना झाल्याचे स्पष्ट होत आहे.
भाजपला पद दिल्यास यांची वर्णी
ठाणे महापालिका निवडणुक युती लढले असल्यामुळे भाजपने महापौर पदावर दावा केला असून तशी मागणी त्यांनी शिंदे सेनेकडे केली आहे. शिंदे सेनेने भाजपाला महापौर पद देऊ केल्यास भाजपकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील दोन नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक १५ (अ) मधून सुरेश कांबळे तर प्रभाग २२ (अ) महिला मधून उषा वाघ यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपकडून या दोघांची नावे महापौर पदासाठी चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.

