Thane Mayor Sharmila Pimpolkar : ठाणे : आठ दिवसांपुर्वी म्हणजेच, ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या ठाणे महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौरपदी तर, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्विकारला होता. तर, महापौर पिंपळोलकर यांनी पदभार स्विकारला नव्हता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच त्या पदभार स्विकारणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, बुधवारी उपमुख्यमंत्री शिंदे हे पालिका मुख्यालयात दाखल होताच, त्यांच्या उपस्थितीत पिपळोलकर यांनी महापौर पदाचा पदभार स्विकारला.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू होती. नुकतीच महापालिकेची निवडणुक पार पडली. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुक निकालानंतर ३ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक जाहीर झाली.
शिंदे गटाच्या शिवसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणले असून, एका अपक्ष नगरसेवकाने पाठिंबा दिल्यामुळे हे संख्याबळ ७६ वर गेले आहे. दरम्यान, युतीत निवडणुक लढविली असल्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. शिवसेना (शिंदे गट) पक्षाने नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांना महापौर पदाची तर, भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांना उपमहापौर पदाची उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल झाला नव्हता.
यामुळे ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले होते तर, मनीष जोशी यांनी सचिव म्हणून काम केले होते. या निवडीमुळे ३ वर्षे १० महिन्यानंतर पालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून आता पालिकेचा कारभार महापौर आणि उपहापौरांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला होता.
या निवडीनंतर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्विकारला होता. तर, महापौर पिंपळोलकर या पहिल्या मजल्यावरील महापौर कार्यालयात गेल्याच नव्हत्या. त्या थेट पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. त्या महापौर कार्यालयातील खुर्चीच न बसताच तेथून निघून गेल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांनी कामाला सुरूवात केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर असल्यामुळे ते महापौर पदभार स्विकरण्याच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते.
या कारणामुळे पिंपळोलकर यांनी पदभार स्विकारला नसल्याची चर्चा होती. सर्वसामान्य महिलेला महापौर पदाची संधी देणारे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच हा पदभार स्विकारण्याचे पिंपळोलकर यांनी ठरविले असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. दरम्यान, आठ दिवसांनंतर म्हणजेच, ११ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री शिंदे हे पालिका मुख्यालयात दाखल झाले यानंतर त्यांच्या उपस्थितीत पिपळोलकर यांनी महापौर पदाचा पदभार स्विकारला. तसेच शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे गटनेते पवन कदम यांनीही यावेळी पदभार स्विकारला.
