सागर नरेकर
अंबरनाथ : सातत्याने होणाऱ्या अतिक्रमण आणि सांडपाण्याच्या निचऱ्यामुळे आक्रसत चाललेल्या वालधुनी नदीला शासनदरबारी ‘नदी’ ही ओळखही नसल्याचे उघड होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखडय़ात या नदीचा नाला असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळय़ात पूरस्थिती निर्माण होत असतानाही या नदीच्या पात्रात पूररेषा निश्चित करण्यात येत नसल्याचे समजते.
अंबरनाथ शहराला लागून असलेल्या टाहुलीच्या डोंगरातून उगम पावणारी वालधुनी नदी अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांतून प्रवास करत उल्हास नदीला जाऊन मिळते. मात्र, गेल्या काही वर्षांत या नदीच्या पात्रात सोडण्यात येणारे कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी आणि त्याकडे शासकीय यंत्रणांनी केलेले दुर्लक्ष यामुळे या नदीची गटारगंगा बनली आहे. या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना आणि पर्यावरणप्रेमी प्रयत्नशील आहेत. त्या मोहिमेत अंबरनाथ नगरपालिकेपाठोपाठ उल्हासनगर महापालिकाही सहभागी झाली आहे. उल्हासनगर महापालिकेने काही दिवसांपूर्वी वालधुनी नदीच्या पूर पात्रात उभ्या राहणाऱ्या बांधकामांना रोखण्यासाठी या नदीची पूररेषा निश्चिती करण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. मात्र, शासनदरबारी वालधुनीची नदी म्हणून नोंदच नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर याबाबत माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदी अधिसूचित नद्यांच्या यादीत नाही. त्यामुळे वालधुनीबाबत कोणताही निर्णय जलसंपदा विभाग घेत नाही. परिणामी त्यावर पूररेषा निश्चितीचे काम होऊ शकलेले नसल्याचे कळते आहे. एकीकडे नदीच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत असताना नदीचा शासनदरबारी आणि अधिसूचित नद्यांच्या यादीत समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे.
विकास आराखडय़ातील नोंदीला आक्षेप
एमएमआरडीएने गेल्या वर्षांत जाहीर केलेल्या प्रादेशिक आराखडय़ात नदी संवर्धन, नदी किनारी हरित पट्टे विकसित करणे आणि नदी किनारी मनोरंजनाची केंद्रे विकसित करणे अशा गोष्टींचा समावेश केला. मात्र या आराखडय़ात वालधुनी नदीचा नाला असा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे याचा उल्लेख शासकीय संस्था नाला असाच करत होते. शिलाहारकालीन शिवमंदिर याच वालधुनी नदीवर आहे. त्यामुळे हा नाला नसल्याची भावना भाविकांची आहे.
रेल्वेचा बाटलीबंद पाणी प्रकल्प
वालधुनी नदीची शासनदरबारी उपेक्षा असली तरी याच नदीच्या प्रवाहावर ग्रेट इंडियन पेनिनसुला अर्थात जीआयपी हा रेल्वेचा बंधारा आहे. त्यावर रेल नीर नावाचा बाटलीबंद पाण्याचा प्रकल्पही आहे. मात्र पश्चिम वाहिनी नद्यांच्या जल आराखडय़ात वालधुनीचा समावेश नाही. जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या नद्यांमध्येही उल्हास नदीला मिळणाऱ्या नदीमध्ये वालधुनीचा समावेश नाही.