ठाणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी सीआयडी चौकशी झाली, पण तिचा अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही. यामागे काहीतरी दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका निर्माण होते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. ठाणे महापालिकेतील गटनेते अभिजीत पवार यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ठाण्यात आले होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते अश्रफ उर्फ शानू पठाण, शहराध्यक्ष मनोज प्रधान उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या अपघातानंतर राज्यभरातून निष्पक्ष चौकशीची मागणी झाली होती. अनेक राजकीय पक्षांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली होती. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतली होती. मात्र सरकारने सीबीआय चौकशी न करता सीआयडीमार्फत तपास सुरू केला आणि त्याचाही अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. सर्व काही पारदर्शक असेल, तर अहवाल जाहीर करण्यात अडचण काय आहे? सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सत्य बाहेर येऊ नये म्हणून प्रकरणात विलंब केला जात असल्याचा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. योग्य वेळी जनता या सर्वाचा जाब विचारेल असेही ते म्हणाले.

ठाणे शहर सातत्याने विस्तारत आहे, लोकसंख्या वाढत आहे, मात्र महापालिकेकडे आजही स्वतःचे धरण नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले. पक्षाचे नगरसेवक आगामी काळात जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेतील, असा इशाराही त्यांनी दिला.

रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असून सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची सुरुवात स्वतःपासून करावी, असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही दिवसांत ३० ते ४० रुपयांनी वाढणार आहेत. ‘जय मोदी’ म्हणत गाय, म्हशी, घोडी यांचा व्यापार मुबलक करणार आहेत. लोक आता गाय, म्हशी, घोडी, गाढवावर बसून प्रवास करतील. आपल्याला अधोगतीकडे नेण्याचे काम हे सरकार करत होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे असा आरोप आव्हाड यांनी केला.