डोंबिवली: शास्त्रीनगर रुग्णालयात सरकारी सेवेतील डाॅक्टरांना शिंदे शिवसेना नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्याकडुन मारहाण होत होती. त्यावेळी हा प्रकार रोखण्यासाठी नगरसेवक म्हात्रे यांच्या संरक्षणातील सरकारी प्रतिनिधी म्हणून अंगरक्षक म्हणून असलेल्या पोलिसाने तात्काळ ही माहिती स्थानिक पोलिसांना देणे गरजेचे होते. याउलट सरकारी सेवेतील पोलीस आणि म्हात्रेंचे खासगी अंगरक्षक दालनात डाॅक्टरांना रमेश म्हात्रेंकडून मारहाण होत असताना, पालिकेच्या सुरक्षा रक्षक आणि कमांडोंना त्या दालनात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्नशील होते, अशी धक्कादायक माहिती आता उजेडात आली आहे.

त्यामुळे रमेश म्हात्रे यांच्या मारहाणीच्या दिवशी तैनात असलेल्या अंगरक्षक पोलिसाला शासनाने तातडीने बडतर्फ करावे, अशी जोरदार मागणी आता डाॅक्टर, वकील, शहरातील विविध स्तरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. ठाण्यात तीन वर्षापूर्वी एका लोकप्रतिनिधीने एका व्यक्तीला समाज माध्यमांवर बदनामीकारक मजकुर सामायिक केला म्हणून पोलिसांसमक्ष मारहाण केली होती.

या सर्व प्रक्रियेत पोलीस सामील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यावर शासनाने या चारही पोलिसांना सेवेतून बडतर्फ केले होते. त्यामुळे तोच न्याय आता रमेश म्हात्रे प्रकरणातील तैनाती पोलिसाला लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक वेळा अंगरक्षक पोलीस संबंधित अति महत्वाच्या व्यक्तीचे तैनाती पोलीस म्हणून वावरण्यापेक्षा त्याचे खासगी गडी, खबरी सारखे वागतात याचीही शासनाने दखल घेण्याची मागणी विविध क्षेत्रातील जाणकारांकडून होत आहे.

सुरक्षा रक्षकांना रोखले

सोमवारी रात्री साडे आठ वाजता रमेश म्हात्रे आपल्या समर्थकांसह शास्त्रीनगर रुग्णालयात आले. यावेळी रुग्णालयातील प्रवेशव्दारावर दोन पुरूष एक महिला सुरक्षा रक्षक तैनात होते. ते पहिल्या माळ्यावरील रुग्ण कक्षात रुग्णाच्या तपासासाठी नेहमीप्रमाणे आले असावेत असा समज पालिका सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाच्या कमांडोंचा झाला. काही वेळाने रुग्णालयाच्या वरच्या भागातून मोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला.

त्यावेळी तातडीने पालिका सुरक्षा रक्षक आणि कमांडो घाईने रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर मोठ्याने आवाज येतो त्या दिशेने निघाले. त्यावेळी रमेश म्हात्रे यांच्या खासगी अंगरक्षक आणि त्यांच्या तैनातीमधील सरकारी सेवेतील पोलिसाने पालिकेच्या सुरक्षा रक्षकांना हाणामारी होत असलेल्या दालनापासून रोखले. तेथे तुम्ही जायचे नाही. आम्ही ते बघुन घेऊ, अशी दटावणी या अंगरक्षक टोळक्याने पालिका सुरक्षा रक्षकांना केली. आम्हाला त्या ठिकाणी जाऊ द्या, त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही येथे आहोत, असे सांगुनही रमेश म्हात्रेंचे अंगरक्षक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे डाॅक्टरांना मारहाण होत असताना तेथे एकही पालिका सुरक्षा रक्षक आढळुन आला नाही, असे एका पालिका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.

एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, अतिमहत्वाच्या व्यक्तीला संरक्षणासाठी दिलेल्या पोलिसाने त्या व्यक्तीचे संरक्षण करायच असते. त्याच बरोबर काही गैर घडत असेल तर ते रोखण्यासाठीही पुढाकार घेतला पाहिजे.

पालिका रुग्णालयात नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षक, कमांडो तैनात होते. त्यांच्या समोरून नगरसेवक म्हात्रे समर्थकांसह वरील दालनात गेले. तेथे ते रुग्ण विचारपूस करण्यास आले असतील असे सुरक्षा रक्षकांना वाटले. मोठ्याने आवाज येऊ लागला तेव्हा तैनाती सुरक्षा रक्षक डाॅक्टर कक्षाकडे गेले. तेव्हा तेथे त्यांना नगरसेवकांच्या अंगरक्षकांनी रोखून धरले. त्यामुळे त्यांना पुढे जाता आले नाही. आता पालिकेच्या रुग्णालयांमध्ये यापूर्वीप्रमाणे पोलीस तैनात करण्याची मागणी आपण वरिष्ठांकडे केली आहे. वरिष्ठही त्यास अनुकूल आहेत.

  • सुरेश पवार सुरक्षा अधिकारी, डोंबिवली.