कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांना मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्या सोबत एका खुनाच्या गुन्ह्यात यापूर्वी तुरूंगवासाची शिक्षा भोगुन आलेला आणि कल्याण डोंबिवली पालिकेत गटार, पायवाटांची कामे करणारा रमेश लक्ष्मण पवार (५०) हाही सहभागी होता. रमेशला पोलिसांनी अटक केली आहे. तो दोन दिवस पोलीस कोठडीत आहे.
रमेश हा डोंबिवली पूर्वेतील दत्तनगरमधील वडारवाडीत राहतो. नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्या माध्यमातून नगरसेवक निधी किंवा मुलभूत सोयीसुविधांतर्गत आलेल्या निधीतून डोंबिवली पश्चिमेतील कोपर, शास्त्रीनगर आणि शहराच्या इतर भागात गटार, पायवाटांची विकास कामे करण्याचे काम आरोपी रमेश पवार करत असल्याचे आता उघडकीला आले आहे. काही वर्षापूर्वी या आरोपीने एका इसमाचा खून केला होता. त्याप्रकरणात रमेशला शिक्षा होऊन त्याला तुरूंगवासाची सहा वर्षाची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगुन सुटल्यानंतर रमेशने नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्या माध्यमातून पुन्हा कल्याण डोंबिवली पालिकेची कामे नगरसेवक म्हात्रे यांच्या माध्यमातून मिळवून कामे सुरू केली होती.
यापूर्वीपासून रमेश पवार मजूर कामगार सोसायटीच्या माध्यमातून ही कामे करत होता. तुरूंगात गेल्यानंतर त्याच्या कामात खंड पडला होता. आता त्याने मागील दोन वर्षापासून पुन्हा कल्याण डोंबिवली पालिकेतील गटारे, पायवाटांची कामे घेऊन ती पूर्ण केली होती. पालिकेतून कामे मिळविण्यासाठी, केलेल्या कामांची देयके काढण्यासाठी तो नेहमीच पालिकेच्या प्रभाग कार्यालय, मुख्यालयात वावरत असे, असे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले.
पालिकेच्या जीवावर मजा
कल्याण डोंबिवली पालिकेच्या जीवावर पैसे कमवून पुन्हा पालिकेच्या डाॅक्टरांना मारहाण करण्यात ठेकेदार रमेश पवार सहभागी असल्याने या रमेश पवार याने डोंबिवलीत ज्या ठिकाणी गटार, पायवाटा, मुलभूत सोयीसुविधांची कामे केली आहेत. त्या कामांची, त्यांच्या दर्जाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी द्यावेत. ही कामे निकृष्ट दर्जाची असतील तर ठेकेदार पवार याला दंड ठोठावुन त्याला पालिकेच्या काळ्या यादीत टाकावे. तसेच, पवार यांची इतर कामांची देयक पालिकेत प्रलंबित असतील तर शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टरांना केलेल्या मारहाणीची शिक्षा म्हणून त्याची ही देयक पालिकेत रोखून धरावीत अशी जोरदार मागणी आता शहरातील विविध स्तरातून करण्यात येत आहे.
पालिकेच्या जीवावर मजा करायची आणि पुन्हा आपल्या पोषिंद्या नगरसेवकाच्या माध्यमातून पुन्हा पालिकेच्या डाॅक्टरांना मारहाण करायची. त्यामुळे अशी गैरकृत्य करणाऱ्यांना दणका देण्यासाठी आयुक्तांनी रमेश पवार यांनी आतापर्यंत केलेल्या मुलभूत सोयी सुविधा कामांची चौकशी लाववी. त्यांची पालिकेत केलेल्या कामांची देयके शिल्लक असतील तर ती पालिकेने रोखून धरण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
पालिकेच्या बांधकाम विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी रमेश पवार काही वर्षापासून पालिकेत मुलभूत सोयीसुविधांतर्गत काम करत असल्याचे, नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रेंच्या माध्यमातून ही कामे करत असल्याचे सांगितले. नगरसेवक म्हात्रे यांच्या दांडगाईचा अनुभव असल्याने गुन्हेगार असुनही पालिका अधिकारी रमेश पवारला काम देत होते, असे पालिकेतील अधिकाऱ्यांच्या चर्चेतून समजते.
