ठाणे: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असून, मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या प्रकरणी महापालिका प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. महिला डॉक्टरवर हात उगारणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी करताना, गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत ही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारावरून झालेल्या वादानंतर डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह काही जणांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील दोघांना घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या कल्याण-डोंबिवली शाखेनेही महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राजू पाटील म्हणाले,
“शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरवर ज्या प्रकारे हात उगारण्यात आला, त्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. मात्र, पालिका प्रशासनाने तब्बल १८ तासांनंतर गुन्हा दाखल करून घेतला. यावरून प्रशासन कुठेतरी कमी पडले किंवा दबावाखाली काम करत असल्याचे दिसून येते. ” पुढे त्यांनी,
“महापालिका प्रशासनाला शास्त्रीनगर रुग्णालय व्यवस्थित सांभाळता येत नसेल, तर राज्य सरकारने ते ताब्यात घेऊन नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, ” अशी मागणी केली.
यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला
“महिला डॉक्टरांवर हात उगारण्याऐवजी निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवणारे ठेकेदार, अनधिकृत फेरीवाले, नालेसफाईची कामे न करणारे ठेकेदार, अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणारे वॉर्ड अधिकारी, तसेच बेशिस्त कामांमुळे कल्याण-शीळ मार्गावर वाहतूक कोंडी करणारे मेट्रोचे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. कारण त्यांच्याकडून टक्केवारी मिळते, ” असा गंभीर आरोपही राजू पाटील यांनी केला.
