कल्याण: शिंदे शिवसेनेचे मुजोर नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी आपल्या आई, वडिल, कुटुंबीयांचा अश्लिल शिवीगाळीच्या माध्यमातून केलेला जाहीर उध्दार, रुग्ण सेवा करत असताना केलेली जबर मारहाण, सुरू असलेले धमक्यांचे फोन, लघुसंदेश यामुळे जबर मानसिक धक्का बसलेल्या शास्त्रीनगर रुग्णालयातील बाह्यस्त्रोत विभागाच्या दोन्ही डाॅक्टरांनी पालिका सेवेचे राजीनामा आपल्या बाह्यस्त्रोत संस्थेकडे सुपूर्द केले आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेतील विश्वसनीय सुत्रांनी दिली.

डाॅ. सृ्ष्टी महेंद्र बाविस्कर, डाॅ. वैभव नामदेव साळुंके अशी राजीनामा दिलेल्या डाॅक्टरांची नावे आहेत. डाॅ. साळुंके हे बी. ए. एम. एस. आहेत. ते मागील चार महिन्यांपासून शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होते. ते आपल्या आई सोबत डोंबिवलीत राहतात. डाॅ. बाविस्कर निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आम्ही मोठे होईपर्यंत आमचे आई, वडील, कुटुंबीय कधी आमच्यावर ओरडले नाहीत. कष्ट, अथक मेहनत, कुटुंबीयांनी खर्च करून आमची वैद्यकीय शिक्षणे पूर्ण केली. आमचा जीवनमार्ग सुरळीत व्हावा यासाठी आम्हाला चांगल्या मार्गाला लावले.

गोरगरीबांसह सामान्य वर्गातील रुग्ण सेवेचे चांगले काम आपल्या हातून नियमित होत राहणार, असा एक आनंद मनात असताना, अचानक एक तिऱ्हाईत व्यक्ती आम्ही रुग्ण सेवा देत असलेल्या दालनात येऊन आम्हाला अर्वाच्च शिवीगाळ करत मारहाण करतो, हे सर्व धक्कादायक आणि सहन न करण्यासारखे असल्याने या डाॅक्टरांनी राजीनामे दिले, असे या डाॅक्टरांसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. या दोन्ही डाॅक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तो होऊ शकला नाही. पण बाह्य स्त्रोत संस्थेतील एका विश्वसनीय सुत्राने मात्र या दोन्ही डाॅक्टरांनी तात्काळ राजीनामे दिले असल्याचे खात्रीलायकरित्या सांगितले.

मारहाणीमुळे डाॅक्टरांची वानवा

मागील ३० वर्षापासून कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालयात स्थानिक नगरसेवक म्हणून रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचा वरचष्मा आणि दहशत असल्याने कोणाही रुग्णालयाला थोडी सेवा मिळाली नाही आणि त्याने थेट रमेश म्हात्रे यांना संपर्क केला की रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी नेहमीच शास्त्रीनगर रुग्णालयात येऊन दांडगाई केली आहे. डाॅक्टरांशी अर्वाच्च भाषेत वर्तन केले आहे. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरुपी काम करणे शक्य नाही, असा विचार करून मागील ३० वर्षात रमेश म्हात्रे यांच्या या दांडगाई वर्तनामुळे पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात फारकाळ डाॅक्टर टिकत नसल्याचे जुन्या जाणत्या डाॅक्टरांनी सांगितले.

डाॅक्टर कितीही ज्येष्ठ, अनुभवी असला तरी रमेश म्हात्रे यांनी त्यांच्याशी नेहमीच चढ्या स्वरातच भाषा आणि वर्तन केले आहे. फक्त ज्येष्ठ डाॅ. अरविंद प्रधान यांच्या समोर मात्र त्यांनी मान वर केली नाही. डाॅ. प्रधान जुने डोंबिवलीकर डाॅक्टर असल्याने त्यांच्यापुढे रमेश म्हात्रे कधी थांबत नसत, असे एका डाॅक्टरने सांगितले.

रात्रीच्या वेळेत दांडगाई

कोपर, सिध्दार्थनगर झोपडपट्टीतील नागरिक हा आपला मतदार आहे. त्यामुळे तो कसाही वागला तरी नगरसेवक म्हणून रमेश म्हात्रे यांनी नेहमीच त्यांच्या गैरवर्तनावर पांघरुण घातले. त्यामुळे सिध्दार्थनगर झोपडपट्टीतील अनेक गुंड, दारुडे रात्रीच्या वेळेत शास्त्रीनगर रुग्णालयात येऊन बिछाना टाकून झोपणे, रुग्णालय मोकळ्या जागेत केस दाढी करणे, गुंगी येणारी लाल औषधे पळून नेणे असे प्रकार करत आहेत. रात्रीच्या आरामासाठी गप्पा मारण्यासाठी रुग्णालयाच्या आवाराचा वापर करत आहेत. याविषयी नगरसेवक म्हात्रे यांच्याकडे तक्रारी केल्या की त्यांना आवडत नसे. उलटट ते या लोकांची मतदार म्हणून बाजू घेत होते, असे स्थानिक जाणत्या नागरिकांनी सांगितले.

डाॅक्टरांचा शुुकशुकाट

शास्त्रीनगर रुग्णालयात स्थानिक नगरसेवकाची नेहमीच दांडगाई आहे. डाॅक्टर मारहाणीचा संदेश राज्यभर पसरला असल्याने यापुढील काळात कोणीही नवीन डाॅक्टर शास्त्रीनगर रुग्णालयात सेवा देण्यासाठी येणार नाही. पालिकेने १०० डाॅक्टरांच्या पदस्थापनेसाठी मुलाखती घतल्या तरी त्यामधील फक्त ५ डाॅक्टर हजर होतात. शास्त्रीनगर रुग्णालया शेजारची डाॅक्टर निवासाची जागा नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी १५ वर्षापूर्वी उद्यानासाठी वापरून डाॅक्टर निवासाची गैरसोय केली. निवासाची सोय नसल्याने कोणीही निवासी डाॅक्टर येथे टिकत नसल्याची चर्चा आहे.

दोन्ही डाॅक्टर बाह्यस्त्रोत संस्थेचे आहेत. त्यांनी राजीनामे दिले असले तरी ते त्यांच्या नियंत्रक संस्थेकडे दिले असतील ते आमच्याकडे अद्याप आलेले नाहीत.

  • डाॅ. दीपा शुक्ल वैद्यकीय आरोग्य अधिकारी.