डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील कोपर भागातील शास्त्रीनगर रुग्णालयातील दोन डाॅक्टर आणि दोन परिचारिकांना शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी सोमवारी संध्याकाळी जीवघेणी मारहाण केली. यात एक महिला डाॅक्टर, दोन परिचारिका आणि एक डाॅक्टरचा समावेश आहे. ‘तुम्ही रुग्णालयातून फक्त बाहेर पडा. तुम्हाला संपून टाकतो,’ अशी धमकीही रमेश म्हात्रे यांनी या डाॅक्टरांना दिली.

शास्त्रीनगर रुग्णालय आपलीच जहागिरी अशा थाटात मागील अनेक वर्ष नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे वावरत असल्याने या रुग्णालयात या दादागिरी, दहशतीमुळे कोणीही डाॅक्टर टिकत नसल्याची पालिका कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. सृष्टी बाविस्कर, डाॅ. वैभव साळुंखे यांना मारहाण झाली. यात डाॅ. वैभव यांना जबर मारहाण झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. परिचारिका नमिता उबाळे, द्रव्या गिरी यांनाही धक्काबुक्की झाली.

काय घडले प्रकरण

शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. या महिलेची सीझर पध्दतीने शस्त्रक्रिया करायची होती. बाळाच्या नाळेला दोन फेऱ्या असल्याने त्याच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार होणे शक्य नव्हते. बाळांचा अति दक्षता विभागही रुग्णांनी भरला असल्याने हे नवजात बाळ ठेवण्यास जागा नाही. आपण बाळावर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढील रुग्णालयात न्या, अशी सूचना स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. बाविस्कर, डाॅ. साळुंखे यांनी या महिलेच्या नातेवाईकांना केली. याच रुग्णालयात जागा करा, अशी गळ या महिलेचे नातेवाईक डाॅक्टरांना घालू लागले. डाॅक्टर जागा नसल्याने तयार नव्हते.

नगरसेवकाला संपर्क

गरोदर महिलेला रुग्णालयात ठेऊ दिले जात नाही, म्हणून या महिलेच्या नातेवाईकांनी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना संपर्क केला. या नगरसेवकाने रुग्णालयातील डाॅक्टरांना मोबाईलवर संपर्क केला. डाॅक्टर रुग्णसेवेत असल्याने त्यांनी या नगरसेवकाला प्रतिसाद दिला नाही. त्याचा राग येऊन नगरसेवक म्हात्रे रागाने शास्त्रीनगर रुग्णालयात आपल्या दांडगट समर्थकांसह आले. रमेश म्हात्रे यांनी डाॅ. साळुंखे यांना जाब विचारत त्यांना अश्लिल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत थेट मारहाण सुरू केली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी डाॅ.साळुंखे यांना ठोशाबुक्क्यांनी मारले. रमेश म्हात्रे यांनी डाॅ.साळुंखे यांच्या डोक्यात फाईलने जोराने मारून त्यांना गंभीर जखमी केले. परिचारिका उबाळे, गिरी या डाॅक्टरांच्या बचावासाठी पुढे सरसावल्या तर त्यांनाही म्हात्रे यांनी धक्काबुक्की केली.

जीवे मारण्याची धमकी

रमेश म्हात्रे यांनी या डाॅक्टरांना ‘तुम्ही फक्त तुमचे रुग्णालयातील कर्तव्य संपून बाहेर पडा. तुम्हाला मी संपूनच टाकतो,’ अशी धमकी दिली. या सर्व प्रकरणाची डाॅ. सृष्टी बाविस्कर वरिष्ठांना माहिती देत होत्या. त्यावेळी रमेश म्हात्रे यांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांच्या हातामधील मोबाईल खाली पाडला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल आणि मारहाण झालेले डाॅक्टर, कर्मचारी तातडीने विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे ‘वरून’ राजकीय दबाव आल्याने सोमवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही.

राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेऊन नगरसेवक रमेश म्हात्रेंवर कठोर कारवाईकरून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी नागरिक, कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आयुक्त गोयल यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

शास्त्रीनगर रुग्णालयातील किती डाॅक्टरांना मारहाण झाली याचा अहवाल मागविला आहे. आम्ही रात्री विष्णुनगर पोलीस ठाण्यात गेलो होतो. पोलिसांशी चर्चा केली आहे. याप्रकरणी कारवाईच्या आवश्यक प्रक्रिया सुरू आहेत.- डॉ दीपा शुक्ल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी.