डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक डोंबिवली शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेश मोरे आणि कल्याण पूर्व शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्या वाढदिवसाचे फलक शिळफाटा रस्त्यावरील दिशादर्शक फलकांवर लावण्यात आल्याने वाहन चालकांचा गोंधळ उडत आहे. शिळफाटा रस्त्याने प्रवास करणाऱ्या नवख्या प्रवाशांचा दिशादर्शक नामफलक झाकले गेल्याने सर्वाधिक गोंधळ उडत आहे. शहराध्यक्ष राजेश मोरे यांचा वाढदिवस होऊन २५ दिवस उलटले आहेत तरी त्यांचे फलक दिशादर्शक फलकांवर झळकत असल्याने प्रवाशांचा संताप होत आहे.

महेश गायकवाड, राजेश मोरे हे खा. शिंदे यांचे खास समर्थक म्हणून ओळखले जातात. १५ सप्टेंबर रोजी राजेश मोरे यांचा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाचे फलक कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील शहरांची नावे आणि दिशादर्शक फलकांवर दोन्ही बाजुने लावण्यात आले. अशाप्रकारे दिशादर्शक नामफलक फळकांनी लपेटून ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याप्रकरणी राजेश मोरे, महेश गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असे रस्ते बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. परंतु, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार, ठाणे जिल्हा, कल्याण डोंबिवलीत खासदारांचे वर्चस्व. त्यामुळे आपणास कोणीही काहीही करणार नाही या अविर्भावात राजेश मोरे, महेश गायकवाड यांनी नामफलक फलक लावून झाकून ठेवले असल्याची चर्चा आहे.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

हेही वाचा : डोंबिवलीत महिलेला तरुणाची बेदम मारहाण

विशेष म्हणजे राजेश मोरे, महेश गायकवाड यांना येत्या काळात विधीमंडळात कल्याण ग्रामीणचे नेतृत्व करण्याची हुडहुडी भरली असल्याची त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे हे दोन्ही शिंदे समर्थक कार्यकर्ते २७ गाव ग्रामीण भागात आपले वर्चस्व दाखविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भागातील लोकांसमोर आपली छबी राहावी म्हणून त्यांनी शिळफाटा रस्त्यावरील नामफलकांचा वापर केल्याचे कळते.कल्याण शिळफाटा रस्त्यावरुन उत्तर भारत, दक्षिण भारत, महाराष्ट्राच्या विविध भागातील वाहने दररोज धावत असतात. या रस्त्यावरील दिशा फलकांमुळे त्यांना कोणालाही न विचारता रस्त्याने मार्गक्रमण करता येते. गेल्या काही दिवसांपासून शिळफाटा रस्त्यावरील दिशादर्शक, शहर नामफलकांची नावे दोन्ही बाजुने फलक लावून बंद करण्यात आल्याने वाहन चालक, प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक वाहन चालक, प्रवासी बाजुच्या वाहन चालकाला नवी मुंबई, मुंबई, ठाणे किंवा भिवंडी, नाशिक, कर्जतकडे जाण्यासाठी रस्ता कोणता अशी विचारणा करत आहेत.

हेही वाचा : “बिकेसीवर गटारी साजरी करणारी मंडळी…”; भास्कर जाधवांचा शिंदे गटाला खोचक टोला

एमएसआरडीसीचे अधिकारी, कर्मचारी नियमित शिळफाटा रस्त्याने आपल्या मुंबईतील कायार्लयात येजा करतात. तेही या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करतात. कल्याण, डोंबिवलीतील प्रवासी, नागरिकांनी राजेश मोरे, महेश गायकवाड यांच्या शिळफाटा रस्त्यावरील नामफलकांवरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘तुमचे वाढदिवस तुम्ही घरात, तुमच्या प्रभागात साजरे करा, नागरिकांची अडचण करुन तुम्ही वाढदिवस कसे साजरे करू शकता,’ असे प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केले जात आहेत.
अधिक माहितीसाठी माजी नगरसेवक महेश गायकवाड, शिवसेना डोंबिवली शहराध्यक्ष राजेश मोरे यांना संपर्क साधला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. महामंडळाच्या अधिकाऱ्याने यासंदर्भात आम्हाला माहिती नाही, पण माहिती घेऊन ते फलक काढून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

कल्याण ग्रामीण भागात काही फट झाले तरी तात्काळ पत्रव्यवहार, ट्वीट करणारेही काही जाणकार या विषयावर गुपचिळी धरुन असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. २७ गावातील कोणीही पदाधिकारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आपल्या वाढदिवस, इतर कार्यक्रमांचे फलक शिळफाटा दिशादर्शक फलकावर लावत नाही. मग हे शहरी सुज्ञ लोक अशी चूक का करतात, असे प्रश्न २७ गावग्रामस्थांनी सांगितले.