ठाणे : शिळफाटा भागात हलक्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एमआयडीसी जलवाहिनी (पाईपलाईन) मार्गाची पुन्हा एकदा आजपासून दुरुस्ती केली जात आहे. या कामानिमित्ताने ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत. त्यामुळे शिळफाटा मार्गावर वाहनांचा भार वाढल्यास वाहतूक कोंडीची भिती व्यक्त केली जात आहे.
कल्याण, डोंबिवली भागातून नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी एमआयडीसी जलवाहिनी मार्ग अत्यंत उपयुक्त ठरतो. परंतु या मार्गाची दरवर्षी दुर्दशा होते. रविवारी या मार्गाच्या दुरुस्ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून केली जाणार आहे. या निमित्ताने या मार्गावर ठाणे वाहतूक पोलिसांच्या मुंब्रा वाहतूक कक्षाने वाहतूक बदल लागू केले आहेत.
असे आहेत वाहतूक बदल
- कल्याणफाटा येथून एमआयडीसी जलवाहिनी मार्गाने नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ बंदी असेल. येथील वाहने शिळफाटा, पुजा पंजाब उपाहारगृह मार्गे नवी मुंबईच्या दिशेने वाहतूक करतील.
- नवी मुंबई येथून एमआयडीसी जलवाहिनी मार्ग येथून कल्याणफाटा येथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना तेथील प्रवेशद्वारापासून बंदी असेल. येथील वाहने शिळफाटा चौकातून पुढे वाहतूक करतील.
- हे वाहतूक बदल ४ ऑक्टोबर पासून सकाळी ७ ते ५ ऑक्टोबर सकाळी ७ या २४ तासांसाठी लागू असतील.
