डोंबिवली – शुक्रवारी सकाळी कामावर जाण्याच्या नोकरदार, व्यावसायिकांच्या घाईच्या गर्दीत कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या एका बसने शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोच्या संरक्षित पत्र्यांना जोराची धडक दिली. पत्रे रस्त्यावर कोसळून बसचा अपघात झाला. ऐन वाहन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडला. त्यामुळे कल्याण शिळफाटा रस्त्यावरील येण्या जाण्याच्या मार्गिकांवर शुक्रवारी सकाळी तुफान कोंडी झाली. मानपाडा रस्त्यावरील डी मार्ट ते मानपाडा चौकापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना एक तासाचा कालावधी लागत होता.
कामावर जाण्याच्या वेळेत हा अपघात झाल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत होते. केडीएमटीची बस कल्याणकडून मानपाडा चौकातून शिळफाटा दिशेने धावत होती. बस मानपाडा चौक सोडून विद्यानिकेतन शाळा छेद रस्त्याच्या पुढे गेल्यानंतर अचानक बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस मेट्रो कामाच्या बाजुच्या संरक्षित पत्र्यांना धडकली. बस धडकताच बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळले. पत्रे जमिनीवर कोसळून मोठा आवाज झाला. बसचा पुढील भाग निकामी झाला. अपघात होताच या बसच्या पाठीमागून येणारी वाहने जागीच थांबली.
५० ते ६० फूट रुंदीच्या शिळफाटा रस्त्यावरील १० ते १५ फुटाचा मधला भाग मेट्रो कामासाठी संरक्षित पत्रे लावून ठेकेदाराने बंदिस्त केला आहे. वाहने येण्यासाठी दहा फुटाचे अरूंद रस्ते दोन्ही बाजुला उपलब्ध आहेत. या बोळातून वाहने धावताना समोरून वाहन आले तर वाहतूक कोंडी होते.
कोंडीला सुरूवात
मानपाडा चौकातून शिळफाटा दिशेने जाणारी वाहतूक बस अपघातामुळे ठप्प झाल्याच समजताच, कामावर जाण्याची घाई असलेल्या नोकरदार दुचाकी, चारचाकी वाहन चालकांनी आणि मालवाहू वाहने, खासगी बस, इतर वाहन चालकांनी विरूध्द मार्गिकेतून वाहने टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समोरून येणारी वाहने विरूध्द मार्गिकेतील वाहने समोरासमोर आल्याने अरूंद रस्त्यावर तुफान कोंडी झाली. विरूध्द मार्गिकेतून घुसणाऱ्या वाहन चालकांवर कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई सुरू करताच अनेक वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली.
मिनिटाच्या प्रवासासाठी तास
शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा चौकात (बुधाजी वझे चौक) कल्याणकडून, डोंबिवली शहरातून मानपाडा रस्त्याने, नवी मुंबई मुंबईकडून वाहने येतात. याशिवाय मानपाडा गावातून वाहने शिळफाटा मुख्य रस्त्यावर येतात. ही सर्व वाहने बस अपघातामुळे जागोजागी अडकून पडली. शिळफाटा रस्त्याला सेवा रस्ता नसल्याने आणि अन्य पर्यायी मार्गाने जाण्याचा रस्ता वेळखाऊ आणि डोकेदुखीचा असल्याने प्रवाशांनी कोंडीत राहणे पसंत केले. मानपाडा रस्त्याने मानपाडा चौकाकडे निघालेल्या प्रवाशांना डी मार्ट ते मानपाडा चौकापर्यंत जाण्यासाठी एक तास लागला. सोनरपाड्याकडून मानपाडा चौकात येण्यासाठी तेवढाच कालावधी लागत होता. उलटसुलट मार्गिकेतून वाहन चालक घुसल्याने सकाळच्या वेळेत शिळफाटा रस्ता वाहन कोंडीने जाम झाला होता. काटई नाका, कोळे नाका, बदलापूरकडे जाणाऱ्या मार्गिकेला या कोंडीचा फटका बसला.
कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी आपला सर्व फौजफाटा घेऊन त्यानंतरच्या अर्धा ते एक तासात बस अपघात घडलेल्या भागातील वाहन कोंडी सोडवून वाहतूक पूर्ववत केली.
शिळफाटा रस्त्यावर मानपाडा गाव हद्दीत केडीएमटीच्या बसने मेट्रोच्या संरक्षित पत्र्यांना धडक दिली. त्यामुळे शिळफाटयाकडे जाणारी एक मार्गिका बंद झाली. अनेक वाहन चालक विरूध्द मार्गिकेतून घुसल्यान कोंडी झाली. ही कोंडी एक तासाच्या आत सोडवून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. – सचिन सांडभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी वाहतूक.
