कल्याण – वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेने शिळफाटा रस्त्यावरील गोळवली गाव हद्दीत रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोरील चौकात दोन वर्षापूर्वी वाहतूक सिग्नल बसविले. त्यामुळे या भागात होणारी सततची कोंडी दूर झाली होती. या चौकातील वाहतूक सिग्नलला उत्तरप्रदेशातून आलेल्या एक ट्रक चालकाने गेल्या आठवड्यात पहाटेच्या सुमारास जोराची धडक दिली. या धडकेत सिग्नलचा खांब रस्त्यावर कोसळून दर्शक दिव्यांचा चक्काचूर झाला. त्यामुळे या रस्त्यावर काही दिवस वाहतूक विस्कळीत झाली.
निष्काळजीपणे, बेदरकारपणे ट्रक चालवून सार्वजनिक मालमत्तेचे आणि कल्याण डोंबिवली पालिकेने बसविलेल्या सिग्नलचे नुकसान केले म्हणून कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या निर्देशावरून या विभागातील वाहतूक हवालदार प्रकाश थोरात यांनी ट्रक चालक मोहमद जिसाद हदिश अहमद (२३, रा. देवजानी गाव, प्रतापगढ जिल्हा, उत्तरप्रदेश) याच्या विरूध्द हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या आठवड्यात कोळसेवाडी वाहतूक विभागाचे हवालदार प्रकाश थोरात, हवालदार कैलास मोकाते रात्री पाळीसाठी वाहतूक नियोजनासाठी शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी अनंतम भागात गस्तीवर होते. ते कल्याण शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी अनंतम चौकासमोरील रस्त्यावर रात्रीच्या वेळेत वाहतुकीचे नियोजन करत होते.
गेल्या आठवड्यात पहाटेच्या वेळेत मानपाडा पोलीस बीट चौकी येथे हवालदार प्रकाश थोरात गस्तीसाठी उभे होते. यावेळी त्यांच्या समोरून एक मालवाहू ट्रक आला. तो रिजन्सी अनंतम चौकातून डावे वळण घेऊन रिजन्सी अनंतमच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जाऊ लागला. हा मालवाहू ट्रक लांब असल्याने वळण घेत असताना त्याला तेथील अरूंद भाग, रस्ता दुभाजकामुळे वळण घेता येत नव्हते. त्यामुळे ट्रक चालक मोहमद अहमद याने ट्रक संथगतीने मागे घेण्याऐवजी भरधाव वेगाने ट्रक मागे घेतला.
मागे घेत असताना चालकाने मागे आरशातून पाहणे आवश्यक होते. तसे न करता चालक मोहमद याने ट्रक भरधाव वेगात मागे घेतला. त्यामुळे चौकाच्या कोपऱ्याला असलेला वाहतूक सिग्नलला ट्रकच्या पाठीमागील बाजुची जोराची धडक बसली. यामध्ये वाहतूक खांब दिव्यांसह जोराने रस्त्यावर कोसळला. यावेळी सिग्नलमधील दिवे फुटले. रस्त्यावर काचांचा खच पडला. खांबा रस्त्यावर पडून वाहतुकीला अडथळा आला. कल्याण डोंबिवली पालिकेने हा वाहतूक सिग्नल बसवला होता.
इतर वाहन चालकांनी ट्रक चालकाला हळूहळू ट्रक मागे घेण्याची सूचना केली होती. त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामधून हा अपघात झाला. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आणि निष्काळजीपणे वाहन चालविले म्हणून भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याने ट्रक चालक मोहमदवर हवालदार थोरात यांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील वाहतूक सिग्नल कोसळल्याने वाहन चालक, पादचाऱ्यांची गैरसोय झाली. अखेर या चौकात वाहतूक सिग्नल नसल्याने या चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक तैनात करण्यात आले. सिग्नल दुरुस्तीचे काम पालिकेकडून सुरू करण्यात आले आहे.
