डोंबिवली – रविवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण शिळफाटा रस्त्यावरील गोळवली येथील रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोरील रस्त्यावर पेट्रोप पंपापर्यंत पाणी तुंबल्याने या भागाला नदीचे स्वरूप आले होते. एक ते दीड फुटापर्यंत तुंबलेल्या या पाण्यातून वाहने चालविताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. पाण्यातील खड्डे आणि तुंबलेले पाणी यामुळे या भागातून वाहने संथगतीने चालविली जात होती.

शिळफाटा रस्त्यावर रात्रीच्या वेळेत अवजड मालवाहू वाहने सर्वाधिक धावतात. ही वाहने रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे संथगतीने चालविली जात होती. त्यामुळे रात्रीच्या वेळेत शिळफाटा रस्त्यावर वाहन कोंडी झाली होती. मोटार, दुचाकी एक ते दीड फूट पाण्यातून चालविणे शक्य नव्हते. मोटारीचे इंजिन पाण्यात बुडत असल्याने अनेक मोटार कार चालक, दुचाकी वाहन चालकांनी पाठीमागे वळून सेवा रस्ता, पर्यायी रस्त्याने कल्याण, शिळफाटा दिशेने पसंत केले.

रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेसा जागा नसल्याने आणि या रस्त्यालगतची गटारे पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहत असल्याने रस्त्यावरील पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबून ते इतस्ता पसरले होते. रिजन्सी अनंतम प्रवेशव्दार ते मोतिलाल स्वीट दुकानाजवळील पेट्रोल पंपापर्यंत रस्त्यावर दुतर्फा पाणी पसरले होते. या भागात मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. या कामाचे सामान या भागात पडले आहे. त्यामुळे वाहन चालकांना पाणी तुंबलेल्या भागातून अरूंद रस्त्यावरून वाहने चालवावी लागत होती.

सोमवारी पहाटे कामावर निघालेल्या प्रवाशांना या तुंबलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागला. अनेक दुचाकी स्वार, मोटार कार चालक या तुंबलेल्या एक ते दीड फूट पाण्यातून आपली वाहने घेऊन पुढे निघाले. परंतु, पुढे काही अंतरावर त्यांची वाहने बंद पडली. ही वाहने सुरू करताना वाहन चालकांची दमछाक सुरू होती.

चौकातील उंचवट्याचे अडथळे

शिळफाटा रस्त्यावर रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोरील भागात डोंबिवलीतून वळण घेण्याच्या मार्गात सेवा वाहिन्या टाकणाऱ्या एजन्सींनी मे मध्ये रस्त्यावर खोदून भूमिगत वाहिका टाकल्या. ही कामे करताना एजन्सींनी वाहतूक विभागाची परवानगी घेतली नाही. मनमानी पध्दतीने रस्ता खोदून वाहिका टाकल्यावर त्यावर फक्त खडी, माती टाकून तो रस्ता बुजविण्याचा प्रयत्न केला. खोदलेला भाग समतल पध्दतीने सिमेंट टाकून बुजविणे आवश्यक होते. पण त्या ठिकाणी खड्डी, माती टाकून तो बुजवल्याने त्या ठिकाणी उंचवटा तयार झाला आहे. या ओबडधोबड उंचवट्यामुळे वाहने त्यावरून येजा करताना आपटतात. तसेच, पावसाचे पाणी या उंचवट्या भागामुळे बाजुच्या वाहून जाण्यास मार्ग नसल्याने ते रिजन्सी अनंतम समोरील चौकात अडून राहते, असे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मागील दोन महिन्यात कोळसेवाडी वाहतूक विभागाने या ओबडधोबड उंचवट्याविषयी, केलेल्या कामाविषयी अनेक तक्रारी संबंधित एजन्सी चालकाकडे केल्या. त्याची दखल घेतली नसल्याचे वाहतूक कर्मचाऱ्यांनी सांगितले. शिळफाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी सेवा वाहिन्या टाकणाऱ्या कंपन्यांच्या एजन्सी मनमानी पध्दतीने खोदकाम करतात. तो खोदकामाचा भाग सुस्थितीत करत नाहीत. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत, असे प्रवाशांनी सांगितले. गेल्या आठवड्यात निळजे रेल्वे स्थानक रस्त्यावर नियमबाह्यपणे खोदकाम करणाऱ्या एजन्सीवर कोळसेवाडी वाहतूक विभागाने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.