ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘होम पिच’ असलेल्या ठाण्यात भाजपने शनिवारी बोलाविलेल्या एका विशेष बैठकीत महापालिकेवर एकहाती सत्तेचा संकल्प सोडल्याने शिंदे समर्थकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असतानाच, आता ठाणे शहरभर लागलेल्या अभिनंदनाच्या बॅनरबाजीत शिंदे-फडणवीस गटतट असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचेच अभिनंदन करणारे बॅनर त्यांच्या समर्थकांनी तर, भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही केवळ उपमुख्यमंत्र्यांच्या अभिनंदानाचेच बॅनर लावले आहेत. यामुळे ठाणेकरही चक्रावले आहेत. तसेच काही बॅनरवर मात्र दोघांचेही अभिनंदन करण्यात आल्याचे दिसून येते असून अशा फलकांची संख्या मात्र कमी दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे हे ओळखले जातात. त्यांचा ठाण्यात मोठा दबदबा आहे. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांना जिल्ह्यातून मोठे समर्थन मिळाले आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन शिंदे यांना उघडपणे समर्थन दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला होता. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांचे समर्थक आमदार आणि कार्यकर्त्यामधून ‘आम्ही शिवसेनेचेच’ असा सुर सातत्याने आळवत असून त्याचबरोबर राज्यात नव्याने स्थापन झालेले सरकार हे शिवसेना-भाजपचेच असल्याचे दावे केले जात आहेत. यामुळे ठाणे महापालिका निवडणुका शिंदे गट आणि भाजप हे एकत्रित लढविणार असल्याचे अंदाज राजकीय जाणकारांकडून वर्तविले जात आहेत. असे असतानाच ठाण्यात भाजपने शनिवारी बोलाविलेल्या एका विशेष बैठकीत महापालिकेवर एकहाती सत्तेचा संकल्प सोडल्याने शिंदे समर्थकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच आता ठाणे शहरातील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या बॅनरबाजीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ठाणे शहरात जागोजागी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकत आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचेच अभिनंदन करणारे बॅनर त्यांच्या समर्थकांनी तर, भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही केवळ उपमुख्यमंत्र्यांच्या अभिनंदानाचेच बॅनर लावले आहेत. यामुळे ठाण्यात बॅनरबाजीत शिंदे-फडणवीस गटतट असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये शिवसेना आणि भाजप असा सरळ टोकाचा सामना गेल्या दोन वर्षात दिसून आला. ग्रामीण भागातही केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्याविरोधात शिवसेनेचे स्थानिक नेते आक्रमक होताना दिसतात. परंतु राज्यात सत्ताबदल होताच मुख्यमंत्री पदाची सुत्र थेट एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपविली गेल्याने हे चित्र बदलेल का याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असतानाच शहरातील बॅनरबाजीमुळे ठाणेकरही चक्रावले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde fadnavis group banner state chief minister municipal corporation supporters ysh
First published on: 04-07-2022 at 16:13 IST