scorecardresearch

शिवसेना नाव आणि चिन्ह मिळताच ठाण्यात शिंदेगटाकडून शाखा ताब्यात घेण्यास सुरुवात, लोकमान्यनगर शाखेच्या वादातून राडा

रविवारी रात्री शिंदे गटाने लोकमान्यनगर येथील शाखेतील उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र काढल्याचे कळते आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे छायाचित्र बसविण्यात आले.

shivsena Lokmanya nagar branch
शिवसेना नाव आणि चिन्ह मिळताच ठाण्यात शिंदेगटाकडून शाखा ताब्यात घेण्यास सुरुवात (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी रात्री शिंदे गटाने लोकमान्यनगर येथील शाखेतील उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र काढल्याचे कळते आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे छायाचित्र बसविण्यात आले. त्यामुळे लोकमान्यनगर येथे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. पोलिसांचे पथक आल्यानंतर दोन्ही गटाचा जमाव पांगवला.

हेही वाचा – माझी निष्ठा कोणीही विकत घेऊ शकत नाही, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

हेही वाचा – ठाण्यातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निकाल दिला आहे. ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्याप्रमाणात आमदार आणि माजी नगरसेवकांचे समर्थन मिळाले आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी रात्री ठाण्यातील लोकमान्य नगर येथील एका शाखेचा संपूर्ण ताबा शिंदे गटाने मिळविण्याचा प्रयत्न केला. या शाखेत उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र होते. ते छायाचित्र भिंतीवरून उतरविण्यात आल्याचे कळते आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे छायाचित्र बसविण्यात आले. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाचे पदाधिकारी एकमेकांसमोर आले. त्यामुळे वातावरण चिघळले होते. घटनेची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी जमावाला पांगविले. याप्रकरणी ठाकरे गटाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 10:35 IST
ताज्या बातम्या