ठाणे : शिंदे गटाचे पदाधिकारी नरेंद्र मालुसरे यांच्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून हल्ल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण प्रसारित झाले आहे.
नरेंद्र मालुसरे हे शिंदे गटाचे उपविभागप्रमुख आहेत. सोमवारी मध्यरात्री ते टेंभीनाका येथे गेले होते. त्यांनी शाखेजवळ दुचाकी उभी केली होती. दुचाकी काढत असताना अनिल चाचड, जयंत उर्फ जॅकी भोईर यांच्यासह त्यांचे दोन साथिदार तेथे आले. हे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत.
महापालिका निवडणूकीपासून दूर राहण्यास सांगितले होते, असे म्हणत नरेंद्र यांना जॅकी भोईर आणि अनिल यांनी शिवीगाळ सुरु केली.
निवडणूका आता पार पडल्याचे नरेंद्र यांनी त्यांना म्हटले असता, जॅकी आणि अनिल यांनी त्यांना पुन्हा शिवीगाळ केली. काहीवेळाने खली आणि देशमुख नावाचे दोघे आले. जॅकी, अनिल, खली आणि देशमुख या चौघांनी मिळून नरेंद्र यांना मारहाण केली. जॅकी भोईर याच्याकडे अग्नीशस्त्राचा परवाना आहे. त्याने नरेंद्र यांना गोळ्या झाडण्याची धमकी दिली. नरेंद्र यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात दाखल आहे.
हाणामारी सुरु असताना पोलिसांचे वाहन जाताना cctv मध्ये दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून पाय काढला का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
