ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी गुरुवारी टेंभीनाका परिसरात आंदोलन केले. या आंदोलनासाठी ठाणे व मुंबईतील शिवसैनिकांसह आमदार, नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने जमल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. ठाणे स्थानक परिसर, कोर्टनाका, बाजारपेठ व जांभळीनाका या महत्त्वाच्या भागांत मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेले नोकरदार, विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची महिनाभरापूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे असल्याचा आरोप पूर्णेकर कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीय व त्यांच्या समर्थकांनी यापूर्वी रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप आहे. या वक्तव्यांच्या निषेधार्थ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे व मुंबईतील शिवसैनिकांना गुरुवारी टेंभीनाका येथे जमण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विविध भागांतून शिवसैनिक, आमदार, नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी गुरुवारी दुपारी टेंभीनाका परिसरात दाखल झाले. या गर्दीचा परिणाम आसपासच्या रस्त्यांवरील वाहतुकीवर झाला.
कोर्टनाका परिसरात न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महाविद्यालये आणि रुग्णालये असल्याने या भागात दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. मात्र, आंदोलनामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने न्यायालयीन कामकाजासाठी आलेले नागरिक, शासकीय कार्यालयांतील कामांसाठी आलेले नागरिक, प्रवाशांचे हाल झाले.
