ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्वच उमेदवार घरोघरी जाऊन मते मागत आहेत. काही ठिकाणी नागरिक विद्यमान नगरसेवकांना पाच वर्षात केलेल्या कामांचा हिशोब विचारत आहेत. असाच प्रकार विटावा परिसरात घडला. यामुळे शिंदे सेनेच्या उमेदवार प्रियंका पाटील या नागरिकांवर संतापल्या आणि त्यांनी ‘आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ’ असे नागरिकांना उद्देशून विधान केले असून यासंबंधीची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने पाटील या टीकेच्या धनी ठरत आहेत.

ठाणे महापालिकेची निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार आहे तर, १६ जानेवारील मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच उमेदवार प्रचार करत आहेत. काही उमेदवार शहरात प्रचार मिरवणुका काढत आहेत तर, काही उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेऊन मते मागत आहेत. समाजमाध्यांद्वारेही उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे. या प्रचारासाठी चार दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे उमदेवारांनी प्रचाराचा जोर वाढविला आहे.

असे असतानाच, शेवटच्या टप्प्यातील प्रचारात उमेदवार आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवताना दिसून येत आहेत. माजी महौपार मिनाक्षी शिंगे यांची कथित ऑडिओ क्लिप प्रसारित झाली असून त्यावरून त्यांच्यावर टिका होत आहे. तर, या क्लिपमध्ये शब्द टाकून खोटा प्रचार करण्यात येत असल्याचा दावा करत पराभव दिसू लागल्याने असा प्रकार सुरू असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. असे असतानाच, शिंदे सेनेच्या आणखी एका महिला उमेदवाराची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने तिच्यावर टिका होत आहे.

कळवा भागातील विटावा, भोलानगर, आनंदनगर, गणपत्ती पाडा या प्रभाग क्रमांक २४ अ मधून शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या उमेदवार प्रियंका पाटील या निवडणुक लढवित आहेत. मागील निवडणुकीत त्या याच प्रभागातून निवडून आल्या होत्या. त्या घरोघरी जाऊन प्रचार करीत असून या प्रचारादरम्यान, त्या मतदारांशी अरेरावी करतानाची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्यात प्रियंका पाटील यांना पाच वर्षात काय कामे केली, अशी विचारणा काही महिलांनी केली. त्यावर त्या संतापल्या आणि ‘अरे जा दुनियाला सांगा नोटाला मतदान टाका, आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ..’, असे म्हणाल्या. त्यावर आम्ही परिसरातील नागरिक आहोत, आम्ही विचारणा असे त्या महिला त्यांना सांगताना दिसून येत आहे. या वादाची चित्रफित समाजमाध्यांवर प्रसारित झाल्याने पाटील या टीकेच्या धनी ठरत आहेत.