डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिकांना डोंबिवली पश्चिमेतील शिंदे शिवसेनेच्या एका नगरसेवकाने सोमवारी संध्याकाळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी सकाळपासून शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांसह कल्याणमधील पालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील कर्मचारी, डाॅक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या रुग्णालयांमधील फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
पालिका रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या नगरसेवकाचा शास्त्रीनगर रुग्णालयातील प्रवेश आणि दांडगाई कैद झाली आहे. ऐन पावसाळ्यात पालिका रुग्णालयात कामबंद आंदोलन सुरू झाल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे हाल झाले. मारहाण झालेले कर्मचारी पालिकेच्या बाह्यस्त्रोत विभागातील कर्मचारी आहेत. शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकाने ज्या पध्दतीने शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिकांना मारहाण, धक्काबुक्की केली आहे. त्यावेळचा त्या नगरसेवकाचा रुद्रावतार पाहून उपस्थित काही कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. लोकांची समाजसेवा करणारा शिंदे शिवसेनेचा एक नगरसेवक एवढी दांडगाई कशी करू शकतो, असे प्रस्न या दांडगाईच्यावेळी रुग्णालयात उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केले.
काम बंद आंदोलन
पालिकेच्या शास्त्रीनगर, कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालय आणि इतर सर्व नागरी सुविधा केंद्रांमधील डाॅक्टरांनी रुग्णालयात या नगरसेवकाच्या दांडगाईचा निषेध आणि या नगरसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांनी दंडाला काळ्या फिती बांधल्या आहेत.
रुग्णालयातील फक्त अत्यावश्यक सेवा अती गंभीर रुग्ण आला तर तेवढ्याच रुग्णासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. नेहमीची बाह्य रुग्ण सेवा विभाग बंद ठेवण्यात आले आहेत.
नेहमीच दांडगाई
मागील अनेक वर्ष शास्त्रीनगर रुग्णालयात आम्ही या नगरसेवक, त्याच्या पंटरची दांडगाई अनुभवत आहोत. वेळोवेळी प्रशासनाने, राजकीय मंडळींनी या नगरसेवकाची पाठराखण केली. त्यामुळे हा नगरसेवक उन्मत्त झाला आहे. त्याला यावेळी धडा शिकवण्यासाठी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी डाॅक्टर कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे. काही वर्षापू्र्वी या नगरसेवकाने भाजपचे नगरसेवक उपमहापौर राहुल दामले यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. पालिका रुग्णालयातील काही प्रस्थापित स्थानिक डाॅक्टर या उन्मत्त नगरसेवकाची हुजरेगिरी करतात. त्यामुळे या डाॅक्टरांच्या हुजरेगिरीचा इतर डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना त्रास होतो, अशीही चर्चा आहे.
नागरिक संतप्त
शिंदे शिवसेनेच्या एका नगरसेवकाने पालिका रुग्णालयातील एका स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅक्टर महिलेला, एका डाॅक्टरला आणि दोन परिचारिकांना मारहाण झाल्याचे समजल्यावर शहरातील नागरिक, खासगी डाॅक्टर, भारतीय वैद्यकीय संघटनेच्या कल्याण, डोंबिवलीच्या सदस्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून कारवाईची मागणी केली आहे.
अनेक गुन्हे
या दांडगाईखोर नगरसेवकावर मागील अनेक वर्षात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे आहेत. दोन वर्षापू्वी निवडणूक काळात या नगरसेवकाला तडीपाराची नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू होती. पाच वर्षापूर्वी या नगरसेवकाने डायघर पोलीस ठाणे हद्दीतील मोकाशी पाडा गावात रात्रीच्या वेळेत दांडगाई केल्याने त्याच्यावर डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पत्रकाराला धमकी
कोपरमधील बेकायदा चाळींविषयी सतत बातम्या प्रसिध्द करतो म्हणून या नगरसेवकाने डोंबिवलीतील एका ज्येष्ठ पत्रकाराला चार दिवसापूर्वी व्हाॅट्सप काॅल करून धमकविण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे शिवसेनेकडून कल्याण डोंबिवली पालिकेत मानाची पदे न मिळाल्याने हा नगरसेवक सैरभैर झाला असून तो राग तो नागरिक, अधिकारी, पत्रकार, डाॅक्टरांवर काढत असल्याचे समजते.
रुग्णालयात डाॅक्टर, परिचारिका रुग्ण सेवा देतात. त्यांच्याकडून काही चूक झाली असेल तर त्यांना समज देता येते. त्यांना मारहाण करणे हा काही प्रभावी उपाय नाही. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात पोलीस चौकी बांधावी, आरोग्य सेवेची अर्थसंकल्पीय तरतुद वाढवून आवश्यक सुविधा रुग्णालयात द्याव्यात. कामबंद आंदोलनात सर्व कर्मचारी सहभागी आहेत.
- सचिन बासरे सरचिटणीस, म्युनसिपल कर्मचारी कामगार सेना.
फोटो
शास्त्रीनगर रुग्णालयात कामबंद आंदोलनामुळे शुकशुकाट.
