ठाणे – ठाणे महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिंदे सेनेतील बंडखोरीमुळे मानपाडा–कोलशेत परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. याच प्रभागातून निवडणूक लढवलेल्या शिंदे सेनेच्या ठाणे महिला जिल्हा प्रमुख व माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता.

संबंधित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आगरी समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणावरून ठाणे महापालिकेचे नगरसेवक संजय भोईर यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना सडेतोड इशारा दिला आहे. “ज्यांची औकात नाही त्यांनी आमच्यावर बोलू नये,” अशा शब्दांत भोईर यांनी आपला संताप व्यक्त केला.

ठाणे महापालिका निवडणुकी दरम्यान सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्याचा आरोप होता. यामुळे आगरी समाजात तीव्र नाराजीचा सूर उमटला होता. या वक्तव्याचा जाहीर निषेध देखील करण्यात आला होता. या प्रकरणावरून समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देताना, ठाणे महापालिकेचे नगरसेवक संजय भोईर यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

संजय भोईर म्हणाले, लोकांनी आमच्यावर ज्या पध्दतीने बोलण्याचा प्रयत्न केला, आमच्या समाजावर बोलण्याचा प्रयत्न केला. ज्यांची औकात नाही त्यांनी आमच्यावर बोलणे उचित ठरत नाही. आपली लेवल बघा आणि बाकीच्यांच्या लेवल बघण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वाटत असेल की आम्ही बोलतो तसेच त्याठिकाणी होत असते किंवा आम्ही बोलतो तसेच त्या समाजावर चालते. पण समोरचा समाज ज्यावेळी उठतो त्यावेळी बाकीचे सगळे झोपले जातात. आगरी समाजावर किंवा भोईर परिवारावर पुन्हा कोणी आक्षेपार्ह बोलण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तितक्याच ताकदीने उत्तर देण्याची क्षमता आमच्यात आहे.

वाद काय आहे

ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर हा परिसर येतो. या भागातून माजी महापौर आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे या निवडूण येतात. याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भुषण भोईर हे गेल्यावर्षी निवडूण आले. त्यांच्यात राजकीय मतभेद आहेत.

यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी मिनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनीही उघडपणे भुमिका मांडली होती. यामुळेच पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून निलंबित केले होते. या कारवाईनंतर लगेचच मिनाक्षी शिंदे यांनीही राजीनामा दिला होता. अखेर शिंदे सेनेने भूषण यांची उमेदवारी कापून वायचळ यांना उमेदवारी दिली होती. यामुळे भूषण यांनी बंडखोरी केली असून ते आगरी समाजाचे आहेत.

मीनाक्षी शिंदे कोण आहेत ?

मीनाक्षी शिंदे या ठाणे महापालिकेच्या माजी महापौर आहेत. त्या महापालिकेतील महिला नगरसेवकांमधील आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्या शिंदे सेनेच्या ठाणे महिला जिल्हा प्रमुख आहेत.