कल्याण: कल्याण डोंबिवली परिसरात कोणीही शिवसेनेचा नगरसेवक गुन्हेगारी विषयक प्रकरणात अडचणीत आला की पहिले त्याला आजारी पडण्याचा कानमंंत्र शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठांकडून दिला जातो. त्या नगरसेवकाला कल्याण डोंबिवलीत ठेवले तर नाहक मित्र पक्षातील ‘मोठे मित्र’ आपल्या नगरसेवकाला पोलिसांच्या माध्यमातून कामाला लावतील, या भीतीने शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठांनी नेहमीच आपल्या नगरसेवकांना आपल्या घराच्या परिसरातील सरकारी रुग्णालयात शाही वैद्यकीय थाटात राहावे म्हणून ठाण्यात दाखल करून घेणे नेहमीच पसंत केले.
या नेहमीच्या प्रथेप्रमाणे डाॅक्टर मारहाण प्रकरणात अटक होताच, रमेश म्हात्रे यांना उच्चरक्तदाबाचा त्रास झाला म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुग्णालयात दाखल न करता, त्यांना ठाण्यात सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठांनी लोकप्रतिनिधी म्हणून आणलेला एक तळमळीचा लोकप्रतिनिधी ही कामे करण्यात माहिर असल्याने रमेश म्हात्रे यांना ठाण्यात पोहचविण्याचे कामही या लोकप्रतिनिधीने केल्याचे समजते. डाॅक्टरांना मारहाण झाल्यानंतर रमेश म्हात्रे यांच्या तीन समर्थकांना पोलिसांनी तातडीने अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले रमेश सुकऱ्या म्हात्रे मात्र बिनधास्तपणे माध्यमांसमोर जाऊन आपण कसे निष्कलंकित आहोत, अशी विधाने करत होते. हा सर्व प्रकार पाहुन डाॅक्टरांसह विविध स्तरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. सर्व बाजुने दबाव वाढल्यानंंतर अखेर संध्याकाळच्या वेळेत रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली.
रक्तदाब वाढला
यापुर्वीची गुन्हेगार पार्श्वभूमी असलेले, रिक्षा चालक (रिक्षा क्रमांक एमएच-०५-८६९२) असलेले रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना विविध प्रकारच्या व्याधी आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक म्हात्रे यांना अटक करण्यासाठी कोपर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहचताच काही क्षण रमेश म्हात्रे हडबडले. त्यांनी अशाप्रकारे अटक होऊ नये आणि वरिष्ठांनी याप्रकरणात हस्तक्षेप करून आपली अटक टाळावी म्हणून प्रयत्न केले. पण, या एका नगरसेवकामुळे अख्खा पक्ष, आपण पक्ष संघटनसाठी करत असलेल्या कामावर माती पडली, असा विचार करून शिंदे शिवसेनेच्या त्या वरिष्ठाने रमेश म्हात्रे यांना ‘जा आता जमा व्हा’ असा सल्ला दिला. म्हात्रे हतबलतेने पोलिसांच्या स्वाधीन झाले.
सिव्हील रुग्णालयात दाखल
पोलिसांच्या ताब्यात येताच म्हात्रे यांचा रक्तदाब अचानक वाढला. कल्याण डोंबिवली पालिकेची सुसज्ज रूग्णालये असताना, नगरसेवक रमेश म्हात्रे यांना याठिकाणी दाखल करण्याऐवजी ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात दाखल करून घेण्याची तजविज करण्यात आली. तेथे डाॅक्टरांनी तपासल्यानंतर फार त्रास नाही म्हणून रुग्णालयातून सोडण्याचे सूचविताच, पुन्हा सूत्रे हलली. मग, जिल्हा रुग्णालयातील एका वरिष्ठाच्या सूचनेवरून पुन्हा म्हात्रे यांचा मुक्काम सिव्हील रुग्णालयातच करण्याचे ठरले.
पक्ष म्हणून थोडी सहानुभूती या ज्येष्ठ नगरसेवकाला मिळाली म्हणून ही कृती करण्यात आल्याचे समजते. याठिकाणी वातानुकूलित खोलीत, घरचे आवडीचे भोजन, शाही थाटात राहता येते म्हणून हा पर्याय निवडला जातो, असे एका डाॅक्टरने सांगितले.
पालिका निवडणुकीच्या काळात शिंदे शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या नातेवाईकासोबत हाणामारी होताच, गुन्हा दाखल होताच, त्यांना आजारी पडण्याचे संदेश देऊन डोंबिवली, कल्याणमध्ये सरकारी, खासगी चांगल्या दर्जाची रुग्णालये असताना, ठाण्यात सिव्हील रुग्णालयात पोलीस कोठडीतील हवा टाळण्यासाठी तब्बल दीड महिने उपचाराच्या नावे मुक्कामी ठेवण्यात आले. तसाच प्रकार आता नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याबाबतीत झाल्याची जोरदार चर्चा आहे.
राज्याच्या आरोग्य विभाग, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयाची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. अधिक माहितीसाठी सिव्हील रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. कैलास पवार यांना अनेक वेळा संपर्क केला. त्यांचा मोबाईल बंद होता.
