कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील दोन डाॅक्टर, दोन परिचारिकांना बेदम मारहाण करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या शिंदे शिवसेनेचे डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागातील ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्यासह त्यांच्या चार समर्थकांवर शास्त्रीनगर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. वैभव साळुंखे यांच्या तक्रारीवरून मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाण झाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा अशाप्रकारच्या गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल आणि सहकारी डाॅक्टर, परिचारिकांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केले. परंतु, एका वजनदार विकासपुरूष लोकप्रतिनिधीने याप्रकरणी हस्तक्षेप करून अशाप्रकारचा गुन्हा दाखल होऊ नये आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांनी या गंभीर प्रकरणात नरमाईची भूमिका घेतली होती. दोन वेळा या लोकप्रतिनिधीने हा गुन्हा दाखल करू नये म्हणून एका पालिका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला दटावल्याची विश्वसनीय माहिती आहे.

दबाव वाढला

पालिका रुग्णालयातील दोन डाॅक्टर, दोन परिचारिकांना बेदम मारहाण झाल्याची दृश्यचित्रफित मंगळवारी दुपारी समाज माध्यमांवर प्रसारित झाली. त्यानंतर डाॅक्टरांची इंडियन मेडिकल असोसिएशन, शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्या बेजबाबदार कृत्याविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. अशा नगरसेवकाला शिंदे शिवसेना पक्षात आश्रय देतेच कशी, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. या नगरसेवक, त्यांच्या समर्थकांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केले जात नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला. मंगळवारी दिवसभर कामबंद आंदोलन केले.

‘आयएमए’च्या कल्याण, डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी, म्युनिसपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन बासरे, उपाध्यक्ष सुरेश तेलवणे, सुनील पवार, तात्यासाहेब माने यांनी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन, नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल केला नाहीतर बुधवारी कल्याण,डोंबिवलीतील खासगी दवाखाने, रुग्णालये मारहाण झालेल्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. सृष्टी बाविस्कर, डाॅ. वैभव साळुंखे, परिचारिका नमिता उबाळे, द्रव्या गिरी यांच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा इशारा आयएमएचे कल्याण अध्यक्ष डाॅ. राजेश राजू व डोंबिवलीच्या डाॅ. कामत यांनी दिला.

दबाव वाढला

पालिका अधिकाऱ्यांवर दिवसभरात दबाव वाढत गेला. त्यानंतर आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून याप्रकरणी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या सूचनेप्रमाणे विष्णुनगर पोलीस ठाण्यात रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि त्यांच्या दांडगट चार पुरूष समर्थक आणि एक महिलेच्या विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२(हल्ला करणे), १२१(१ दुखापत करणे), ३५१(१ धमकी देणे), ३५२ (संघटितपणे मारहाण), १८९(२, जमाव जमवून हल्ला), १९१(२, इजा करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर नगरसेवक म्हात्रे यांच्यासह समर्थकांना तातडीने अटक करण्याची मागणी आयएमए, शहरातील विविध जाणत्या नागरिकांकडून पोलिसांकडे लावून धरण्यात येणार आहे.