कल्याण : भाजप लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांना जेथे वैचारिक, राजकीय उच्च दर्जाचे मार्गदर्शन केले जाते, त्या भाईंदर उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत सोमवारपासून शिंदे शिवसेनेच्या कल्याण डोंबिवली पालिकेतील ६० नगरसेवकांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण वर्ग ( चिंतन शिबीर) सुरू आहे. शिबीराचा आजचा दुसरा दिवस आहे.

मागील अनेक वर्ष शिंदे शिवसेनेची शिबिरे शहरातील भव्य सभागृह, निसर्गरम्य वातावरणातील शेतघरे अशा मोकळ्या जागेत घेतली जात होती. परंतु, मागील अनेक वर्षानंतर प्रथमच भाजप, संघाची बैठक असलेल्या शिंदे गटाचे नगरसेवकांचे मार्गदर्शन शिबीर म्हाळगी प्रबोधिनीत घेतले जात आहे.

उल्हासनगर पालिकेचे ११ नगरसेवक अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली जनतेच्या कर रकमेतून जमा झालेले ६५ लाख रुपये घेऊन गुवाहाटी दौऱ्यावर गेले आहेत. या विषयावरून उल्हासनगर शहरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. आता कल्याण-डोंबिवली पालिकेचे नगरसेवक, अधिकारी अभ्यास दौऱ्याचे निमित्त करून इंदूर येथे जाणार असल्याची चर्चा आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. रमेश सुकऱ्या म्हात्रे प्रकरणामुळे शिंदे शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेत भाजप, शिंदे शिवसेनेची सत्ता असली तरी या पालिकांवर एकहाती शिंदे शिवसेनेचा वरचष्मा आहे.

म्हात्रे प्रकरण

शिंदे गटाचा कल्याण-डोंबिवली पालिकेतील ७३ वर्षाचा ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याने गेल्या महिन्यात पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील दोन महिला, पुरुष डाॅक्टरांना बेदम मारहाण केली होती. म्हात्रे चार वेळा पालिकेच्या स्थायी समितीचा सभापती होता. म्हात्रेने डाॅक्टरांना मारहाण केल्याने शिंदे शिवसेनेला महिनाभरापासून समाजमाध्यमांत नागरिकांकडून लक्ष्य केले जात आहे. नगरसेवक म्हणून आपली कर्तव्य काय आहेत. ते समजून घ्या. नगरसेवक म्हणजे मी काहीही करू शकतो हा भ्रम लोकप्रतिनिधींनी मनातून काढुन टाकावा. नगरसेवकाची कर्तव्य काय आहेत हे नगरसेवकांना समजावीत या दूरगामी विचारातून या शिबिराची आखणी शिंदे गटाकडून करण्यात आल्याचे समजते.

एकनाथ शिंदेंकडून मार्गदर्शन

उत्तन येथील या दोन दिवसीय शिबीरात मंगळवारी दुपारी चार वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वता आपल्या नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहतील. रमेश म्हात्रे प्रकरण घडल्यानंतर प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. या संदर्भात महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांना संपर्क साधला. त्यांंनी प्रतिसाद दिला नाही.

शिवसेनेच्या या दोन दिवसीय शिबीरात महापालिका कायदे, समाज माध्यम वापर, जनसंपर्क-सुसंवाद, नगरसेवकांची कर्तव्य अशा अनेक विषयांवर तज्ज्ञ व्याख्याते मार्गदर्शन करत आहेत. नगरसेवक म्हणून आपण काय केले पाहिजे, आपले अधिकार, कर्तव्य याची समग्र माहिती या प्रशिक्षण वर्गातून देण्यात येत आहे.- विश्वनाथ राणे, गटनेते शिंदे शिवसेना</strong>.