कल्याण : ठाकरे गटाचे डोंबिवलीतील जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या सोबत कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते आणि एकेकाळचे शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या इशाऱ्यावरून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशी चर्चा सुरू होताच, महेश गायकवाड यांना इतर पक्षात उडी मारून पळून जाण्याची संधी न देता शिंदे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महेश गायकवाड यांना शनिवारी रात्रीच मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला नेले. तेथे त्यांना कल्याण, उल्हासनगर विधानसभा प्रमुख पदावर नियुक्त केल्याचे पत्र दिले.

हे पत्र मिळाले नसते तर रात्रीतून कोणत्याही हालचाली होऊन महेश गायकवाड शिंदे शिवसेनेत राहणे मुश्किल होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कल्याण पूर्वेतील महेश गायकवाड शिंदे शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक, पालिकेत त्यांनी शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक म्हणून नेतृत्व केले. भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड अनेक वर्ष अपक्ष, पक्षीय माध्यमातून विधानसभेत कल्याण पूर्वचे नेतृत्व करत आहेत.

कल्याण पूर्वमध्ये शिंदे शिवसेनेचे जाळे विस्तारले पाहिजे. या भागात गणपत गायकवाड यांना शह देण्यासाठी एक नवे नेतृत्व तयार केले पाहिजे म्हणून शिंदे शिवसेनेतील एका विकासपुरूष हरहुन्नरी नेत्याने महेश गायकवाड यांना आता तूच यापुढे कल्याण पूर्वेचा शिंदे शिवसेनेचा विधानसभेचा उमेदवार म्हणून त्यांना मोकळीक दिली. महेश गायकवाड रात्रंदिवस काम करून कल्याण पूर्वेचा आपणच आमदार अशा अविर्भावात कल्याण पूर्व भागात कामाला लागले. या सगळ्या राजकीय चढाओढीत येत्या काळात आपले कल्याण पूर्वेतील विधानसभेचे तिकीट कापले जाते की काय अशी शंका भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना येऊ लागली.

ठाण्यातील एका प्रकरणावरून माजी आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे पिता-पुत्रांवर राग होताच. कल्याण पूर्वेत आपणास शह देण्यासाठी शिंदे शिवसेनेतील एका विकासपुरूष नेत्याने खेळी केल्याचे लक्षात आल्यावर माजी आमदार गणपत गायकवाड आक्रमक होऊन महेश गायकवाड यांच्या प्रत्येक खेळीला तोडीस तोड उत्तर देऊ लागले. या चढाओढीत एक जमीन प्रकरणात दोन्ही गायकवाडांमधील वाद टोकाला गेला. जमीन वाद प्रकरणात जुन्या राग उफाळून आल्याने गणपत यांनी पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गणपत यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देऊन शिंदे शिवसेनेसह महेश यांनाही डिवचले. त्या रागातून महेश गायकवाड शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी सुलभा गायकवाड यांच्या विरुध्द तगडी निवडणूक लढवली. पक्षविरहित असलेले महेश यांची भाजप प्रदेशाध्यक्ष महेश गायकवाड यांची काही वेळा भेटी घेतल्या. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. महेश भाजपमध्ये जाणार अशी शनिवारी रात्री जोरदार चर्चा सुरू असतानाच, महेश यांनी गडबड करण्यापूर्वीच शनिवारीच शिंदे शिवसेनेने महेश यांंना मुंबईत बोलावून त्यांच्या गळ्यात विधानसभा प्रमुख पदाची माळ घातली. आणि त्यांना शिंदे शिवसेनेत जखडून ठेवले.