शिवसेना शाखेचा ताबा घेण्यावरुन काल (शुक्रवार) रात्री शिवसेनेच्या शिंदे, ठाकरे गटात जोरदार वादावादी झाल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. ठाकरे गटातील शहरप्रमुख विवेक खामकर यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणातील विस्तृत माहिती पोलीस ठाण्यातून मिळालेली नाही.

वसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, डोंबिवली पश्चिमेत कदम इमारतीत शिवसेनेची एक जुनी शाखा आहे. शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्याची मोहीम सध्या सुरू आहे. त्यामुळे या कामासाठी शुक्रवारी डोंबिवली शिवसेनेचे शहर प्रमुख विवेक खामकर, महिला आघाडी प्रमुख कविता कावंड, किरण मोंडकर, शाम चोगले व इतर शिवसेना कार्यकर्ते गेले होते. त्यावेळे तेथे उपस्थित शिंदे गटातील शिवसेना पदाधिकारी परेश म्हात्रे यांच्या बरोबर शाखेत ठाकरे गटातील पदाधिकारी येणे, शाखेचा ताबा या विषयावरुन वादावादी झाली. यावेळी शहरप्रमुख खामकर, म्हात्रे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

१५ हजार रुपये चोरल्याचा आरोप –

या वादातून शाखा पदाधिकारी परेश म्हात्रे यांनी शहरप्रमुख खामकर, गावंड व इतर दोन जणांच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार करुन १५ हजार रुपये चोरल्याचा आरोप केला. याप्रकरणी पोलिसांनी ठाकरे गटातील चार शिवसेना पदाधिकाऱ्यां विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शहराध्यक्ष खामकर यांना अटक करण्यात आली आहे, असे पदाधिकाऱ्याने सांगितले.

शाखा ताब्यात घेण्यावरुन आता वाद रंगण्याची चिन्हे –

ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिंदे गटातील परेश म्हात्रे गटा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शाखा ताब्यात घेण्यावरुन आता वाद रंगण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यात कल्याण पूर्वेत शिंदे गटातील माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे यांच्यावर हल्ल्याचे प्रकरण घडले होतो. आता डोंबिवलीत ठाकरे गटातील शिवसैनिकां विरुध्द थेट गु्हा दाखल झाल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

हे न पटणारे स्तर सोडणारे राजकारण योग्य नाही –

“प्रतिज्ञापत्र भरुन घेण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी शहरप्रमुख खामकर, कविता गांवड व इतर पदाधिकारी दिनदयाळ रस्त्यावरील शिवसेना शाखेत गेले होते. तेथे उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्याने खामकर यांच्याशी वाद घातला. पैसे चोरल्याचा आरोप केला. हे न पटणारे स्तर सोडणारे राजकारण योग्य नाही.” अशी प्रतिक्रिया कल्याणचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी दिली आहे.