(स्थळ – मातोश्री कलानगर, मुंबई.) कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिक विजय उर्फ बंड्या साळवी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर मातोश्रीवर समोरासमोर बसलेले असताना व संघटनात्मक विषयावर त्यांच्यात चर्चा सुरू असताना, अचानक साळवी यांना बंडखोर एकनाथ शिंदे यांचा फोन आला. उध्दव ठाकरे आणि साळवी यांची नजरानजर झाली आणि ठाकरे यांनी फोन कोणाचा ते ओळखले. ‘तुमच्या बोलण्यात माझा अडसर नको. तुम्हाला बोलताना कोंडल्यासारखे वाटू नये म्हणून थोडा वेळ बाजूच्या खोलीत जातो. तुम्ही दिलखुलास बोला’ असे साळवी यांना सांगून उध्दव ठाकरे बाजुच्या दालनात गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांनी आपण घेतलेली भूमिका आणि त्या भूमिकेसंदर्भात विजय साळवी यांना विचारणा केली, त्यावेळी साळवी यांनी आपण मातोश्रीमध्ये बसलो आहोत हे दाखवून न देता “आपण शिवसेने सोबतच राहणार आहोत. लहानपणापासून ज्या संघटनेते वाढलो. ज्या संघटनेने मोठे केले ती संघटना सोडण्याचा विचार मनात येऊ शकत नाही,’ असे शिंदे यांना सांगितले. त्यावेळी शिंदे यांनी ‘मीही शिवसेनेतच आहे,’ असे म्हटले. त्यावेळी साळवी यांनी उव्दिग्न होऊन ‘शिंदे साहेब आपण निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत. आपले चुकलेच आहे. त्यामुळे तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. ”,’ असे शिंदे यांना सुनावले.

हे संभाषण संपल्यानंतर बाजुच्या दालनात असलेले पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पुन्हा साळवी बसलेल्या दालनात येऊन बसले. त्यावेळी शिंदे काय बोलले याविषयी चकार शब्द न विचारता ठाकरे यांनी पुन्हा संघटनात्मक बांधणी, यापुढील काळातील पक्षाची रणनीती विषयावर साळवी यांच्यासह तेथे जमलेल्या सेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

विश्वासू चेल्यानेच बंडखोरी करून दगा दिल्याने आपण खूप व्यथित आहोत –

अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना, ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे करून त्यांना मुख्यमंत्री पद देण्याची सूचना केली होती. एवढा विश्वास ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टाकला होता. या सगळ्या घटनांचे आपण साक्षीदार आहोत. शिंदे यांनी बंडखोरी करून त्या विश्वासाला छेद दिला आहे. ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे हेच सर्वेसर्वा हाच संदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसैनिक, पदाधिकारी, नेत्यांना दिला होता. ठाणे जिल्ह्यातील सेनेतील नियुक्त्या, पालिका आयुक्त, पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांमध्ये शिंदे यांना ठाकरे यांनी पूर्ण मोकळीक दिली होती. विकास कामांसाठी निधी वाटप. त्यात मातोश्रीचा कोणताही हस्तक्षेप ठेवला नव्हता. हे सर्वदूर माहिती असताना शिवसेनाप्रमुखांनंतर मोठ्या कष्टाने, ताकदीने पक्ष पुढे नेणारे उध्दव ठाकरे यांना एका विश्वासू चेल्यानेच बंडखोरी करून दगा दिल्याने आपण खूप व्यथित आहोत, असे स्पष्ट मत विजय साळवी यांनी व्यक्त केले. यापुढे आपण उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेनेतच काम करणार आहोत, असे साळवी म्हणाले.

याशिवाय दोन दिवसापूर्वी कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिक काका हरदास यांनी शिंदे यांच्या बंडखोरीवर नाराजी व्यक्त करून निष्ठावान शिवसैनिक हा उध्दव ठाकरे यांच्या सोबतच राहिल, असा विश्वास व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर आता साळवी यांनीही परखड मत व्यक्त केल्याने गेल्या पाच दिवसांपासून गुपचिळी धरून बसलेले शिवसैनिक आता हळूहळू आपण कोणाच्या बाजुचे याविषयी मत व्यक्त करू लागले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shindesaheb you have not acted like a shiv sainik we cannot come with you msr
First published on: 25-06-2022 at 12:44 IST