कल्याण- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे व्दिधा मनस्थितीत अडकलेल्या शहापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर तीव्र नाराजी व्यक्त करून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या आठवड्यापासून शहापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांमध्ये शिंदे यांच्या बंडखोरीवरून चलबिचल सुरू होती. तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेला तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पूर्णविराम देण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या निषेधाच्या तर उध्दव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. शिवसेना फोडण्याचे प्रयत्न करणाऱ्या गद्दारांना आता जवळ न करता त्यांना धडा शिकवू या, असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.




तालुक्याच्या विविध भागातील शिवसेना पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. शहापूर तालुका उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, माजी आ. पांडुरंग बरोरा, किसन भांडे, अरुण कासार, संतोष शिंदे, प्रकाश वेखंडे, वंदना भांडे, नगराध्यक्षा गायत्री भांगरे, महिला आघाडीच्या मंजुषा जाधव, रश्मी निमसे, योगिता धानके, गुलाब भेरे, राजेश विशे, भरत बागराव, रवी लकडे, गणेश राऊत, विजय भगत हे पदाधिकारी उपस्थित होते.