राज्यातील सत्तेत सहभागी असल्याचे भान ठेवण्याचा भाजपला टोला
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांच्या नावाचा वापर करत भाजपने सुरू केलेल्या प्रचारामुळे संतापलेल्या शिवसेनेने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यातील सत्तेत शिवसेनाही सहभागी आहे याचे भान भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बाळगावे, असा टोला लगावला आहे. निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी रवींद्रन यांनी बेकायदा बांधकामप्रकरणी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना नोटीशी बजाविल्या होत्या. याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सचिन पोटे यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असे असताना भाजपच्या फेसबुक पानावर रवींद्रन यांचे छायाचित्र झळकल्याने या मुद्दय़ावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचारात प्रमुख राजकीय पक्षांनी यंदाही विकासाच्या मुद्दय़ाला वाकुल्या दाखविल्याचे चित्र दिसत आहे. एकमेकांच्या ‘कुंडल्या’ बाहेर काढत आरोपांची राळ उडविण्यातच स्थानिक नेते धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी शिवसेनेचे नेते विकासाच्या मुद्दय़ावर जनतेला समोरे जात असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात मात्र व्यक्तिगत दोषारोप हेच निवडणूक प्रचाराचे सूत्र असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या फेसबुक पानावर महापालिका आयुक्त ई.रवींद्रन यांचे छायाचित्र टाकण्याच्या मुद्दय़ावरून शिवसेनेचे नेते आक्रमक झाले असून, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी रात्री भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

प्रचारासाठी आयुक्तांचा वापर
महापालिका निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराचे फेसबुक पान तयार केले आहे. या पानावर महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना मुख्यमंत्र्यांनी कल्याण-डोंबिवली शहरात कसे नियुक्त केले, तसेच आयुक्त कसे प्रामाणिक प्रयत्न करून शहराचा कायापालट करीत आहेत, याविषयीचा प्रचार केला जात आहे. तसेच शहरात सकारात्मक बदलासाठी भाजपला मतदान करा, असे आवाहनही केले जात आहे. याप्रकरणी आयुक्तांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांना नोटीस पाठवली आहे.

आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे..
या मुद्दय़ावरून शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी ट्विट करताना महापालिकेत भाजपधार्जिणा कारभार सुरू असल्याची टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयुक्तांना पत्र पाठवून भाजपने आपल्या छायाचित्राचा कसा दुरुपयोग केला याविषयी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. आयुक्त हे एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे भाजपने त्यांच्या नावाचा दुरुपयोग करू नये, अशी मागणी खासदार िशदे यांनी केली आहे.