नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचे खासदार राजन विचारे हे लोकसभेत शिवसेनेचे नवे मुख्य प्रतोद असतील. यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्याऐवजी विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद बदलाची माहिती राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवून दिली. संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी सुरू होत असून त्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.

राज्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपशी युती करण्याची विनंती केली होती. खासदार राहुल शेवाळे यांनीही उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. शिंदे गटातील बंडखोर आमदार गुलाबराब पाटील यांनी शिवसेनेचे डझनभर खासदार शिंदे गटात सामील होतील, असा दावा केला होता.

आमदारांनंतर खासदारांकडूनही संभाव्य बंडाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शिवसेनेने लोकसभेतील मुख्य प्रतोद बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार असून राज्यसभेत तीन खासदार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena appoints rajan vichare as chief whip in lok sabha zws
First published on: 07-07-2022 at 02:58 IST