badlpur school case : बदलापूर : मी संबंधित महिला पत्रकाराच्या बाबतीत कोणतेही अपशब्द काढलेले नाहीत. केवळ आणि केवळ मला बदनाम करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी सुरु आहे. मी कोणत्याही प्रकारचे असे अपशब्द वापरलेले नाहीत. पोलिसांनी देखील याबाबत तपास करून निर्णय घ्यावा. माझ्या बाजूने देखील कायदेशीर पद्धतीने उत्तर देण्यात येईल. असे स्पष्टीकरण शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहे. तर उबाठा गटाकडून याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप ही वामन म्हात्रे यांनी केला आहे.
बदलापूर येथील आदर्श शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी सर्व बदलापूर वासियांनी मंगळवारी शहरभरात आंदोलन पुकारले होते. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना पत्रकारांनीही हा विषय लावून धरला होता. याच कारणावरून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांची एका महिला बातमीदारासोबत बोलताना जीभ घसरली होती. “तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे”, अशा भाषेत म्हात्रे यांनी महिला बातमीदारावर आगपाखड केल्याचे आरोप केले जात होते. यावर वामन म्हात्रे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी संबंधित महिला पत्रकाराच्या बाबतीत कोणतेही अपशब्द काढलेले नाहीत. केवळ आणि केवळ मला बदनाम करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी सुरु आहे. मी कोणत्याही प्रकारचे असे अपशब्द वापरलेले नाहीत. पोलिसांनी देखील याबाबत तपास करून निर्णय घ्यावा. माझ्याबाजूने देखील कायदेशीर पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असे स्पष्टीकरण वामन म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले. मी सच्चा शिवसैनिक आहे. मी कोणत्याही खोट्या गोष्टींना घाबरत नाही. पोलिसांनी तपास करावा आणि माझी चूक आढळ्यास माझ्यावर गुन्हा दाखल करावा. या सगळ्या प्रकरणात मला अडकवण्यात येत आहे. यासाठी विरोधकांकडून राजकीय स्टंटबाजी केली जात आहे. असे ही वामन म्हात्रे म्हणाले आहेत.
पोलिसांवर दबाव – सुषमा अंधारे
वामन म्हात्रे हे शिंदे गटाचे आहेत, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहे. यामुळे एका महिला पत्रकाराविषयी असे वक्तव्य करून आंदोलन अधिक चिघळवण्याचा प्रयत्न करून सुद्धा वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आहे का ? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून सुषमा अंधारे या दुपारपासून बदलापूर पूर्व स्थानकात ठिय्या मांडून बसल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे आरोप केले आहेत.