शिवसेना विरुद्ध भाजप वाद उफाळून येण्याची चिन्हे

ठाणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर ठाण्यातील शिवसैनिकांनी भाजप कार्यालयावर मंगळवारी हल्ल्याचा प्रयत्न केल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हे वातावरण निवळत असतानाच शिवसेनेने संपूर्ण शहरभर बॅनरबाजी करत त्यातून राणे यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. या बॅनरबाजीमुळे शिवसेनाविरुद्ध भाजप असा वाद आणखी उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर ठाण्यातील शिवसैनिकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात राणे यांच्याविरोधात तक्रार दिली होती. यानंतर शिवसैनिकांनी खोपट येथील भाजपच्या शहर कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. शिवसैनिकाने कार्यालयावर एक दगड भिरकावला होता. तसेच शाई फेकली होती. शिवसैनिकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे कार्यकर्तेही लाठय़ा-काठय़ा घेऊन कार्यालयाबाहेर जमले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच दोघांना रोखल्याने हाणामारीचा प्रसंग टळला.  यामुळे ठाणे पोलिसांनी भाजप तसेच शिवसेना कार्यालय परिसरासह संपूर्ण शहरात बंदोबस्त वाढविला होता. ही तणावाची परिस्थिती निवळू लागत असतानाच बुधवारी सकाळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि ठाणे जिल्हाप्रमुख, महापौर नरेश म्हस्के यांनी शहरात राणेंविरोधात बॅनर लावले आहेत.  ‘बरळत ‘रा’ह‘णे’ तुमचे काम आहे. जीभ ताब्यात ठेवा. शिवसैनिक ठाम आहे. आज, उद्या, कधीही.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत’ असा मजकूर बॅनरवर लिहिला आहे. या बॅनरच्या माध्यमातून राणेंवर अप्रत्यक्षपणे टीका करत त्यांना शिवसेनेने इशारा दिला आहे. शहरातील तणावाची परिस्थिती निवळत असतानाच शिवसेनेने शहरभर लावलेल्या बॅनरमुळे शिवसेनाविरुद्ध भाजप असा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.