पालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत वाद
ठाणे : ‘महापालिका इमारतीखाली ये बघतोच तुला..’, ‘इमारतीखाली नाही तर तुझ्या घरी येऊन बघेन’.. एखाद्या गल्लीतील गुंडांच्या तोंडी शोभेल अशी जाहीर दमबाजी शुक्रवारी झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी एकमेकांना केल्याचे दिसून आले. या शाब्दिक चकमकीमुळे वाद वाढत असल्याचे लक्षात घेऊन अखेर सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकरणात मध्यस्थी करून हा वाद मिटविला.
ठाणे पूर्व परिसरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मलवाहिनी आणि पाणीपुरवठय़ासंबंधीचे काम सुरू आहे. या कामावरून शुक्रवारी झालेल्या ऑनलाइन सभेत शिवसेना नगरसेविका मालती पाटील आणि भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांच्यात वाद झाला. या कामासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामामध्ये जलवाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत असल्याचे भाजप नगरसेवक चव्हाण यांनी सांगितले, तर ही कामे शिवसेना नगरसेवकांमार्फत सुरू असल्याचे भाजप नगरसेवक चव्हाण हे नागरिकांना सांगत असून यामुळेच आम्हाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा शिवसेना नगरसेविका मालती पाटील यांनी केला. यावरूनच पाटील आणि चव्हाण यांच्यात शाब्दिक वाद रंगला असतानाच या वादात सभागृह नेते अशोक वैती यांनी उडी घेतली. महिला सदस्याशी बोलताना व्यवस्थित बोला, अशी सूचना वैती यांनी केली. यावरून वैती आणि चव्हाण यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या दरम्यान ‘महापालिका इमारतीखाली ये बघतोच तुला..’ असे वैती यांनी चव्हाण यांना म्हटले, तर ‘इमारतीखाली नाही तर तुझ्या घरी येऊन बघेन..’ असे प्रतिउत्तर चव्हाण यांनी वैती यांना दिले. या जाहीर दमबाजीनंतर दोन्ही नगरसेवकांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वपक्षीय नगरसेवकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला.
