पोटनिवडणुकीत दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेतील तिजोरीच्या चाव्या भाजपकडे सोपवून ठाण्यात युतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र शिवसेनेकडून पद्धतशीरपणे रंगविले जात असले तरी येत्या महिन्यात होऊ घातलेल्या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात अर्ज दाखल केल्याने ही लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. कळव्यालगत असलेला विटावा प्रभाग शिवसेनेने सोडावा, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला असून त्यामुळे या दोन्ही पक्षातील तणाव वाढला आहे.

ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३२ आणि ५३ मध्ये पोटनिवडणूक होत आहे. किसननगर परिसरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक संजय घाडीगावकर यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे पद रद्द झाले, तर कळव्यात पूर्वी काँग्रेसमधून निवडून आलेले आणि आता शिवसेनावासी झालेले राजा गव्हारी यांना दीपक पाटील हत्याप्रकरणात शिक्षा सुनाविण्यात आल्याने त्यांचे पद आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रद्द ठरविले. या दोन प्रभागांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाल्या असून आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्याने या पोटनिवडणूकीत विजयी होण्यासाठीचा  राजकीय पक्षांमधील संघर्ष पहावयास मिळणार आहे.

भाजप संघर्षांच्या भूिमकेत

साडेचार वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीत येथील भटवाडी प्रभागातून कॉग्रेसचे संजय घाडीगावकर  विजयी झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने घाडीगावकर यांचे पद रद्द झाल्याने या प्रभागात पोटनिवडणुक होत आहे. दुसरीकडे काँग्रेसने तिकीट नाकारल्याने घाडीगावकर यांनी आपल्या समर्थक स्वाती देशमुख यांना िरगणात उतरविले आहे. घाडीगावकर यांच्या बंडखोरीमुळे नव्यानेच शहर अध्यक्षपदाची सुत्र स्विकारलेले काँग्रेस नेते मनोज िशदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र विशेषत शिवसेना नेत्यांकडून रंगविले जात असते. साडेचार वर्षांपुर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत कळव्याची जागा युतीकडून भाजपने लढवली होती. त्यामुळे पोटनिवडणुकीत ही जागा पुन्हा पक्षाला मिळावी, अशी मागणी भाजपने शिवसेनेकडे केली. मात्र, या भागातील नगरसेवक राजा गव्हारी शिवसेनेत आल्याने ही जागा भाजपला सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली आहे. विटावा अर्थात प्रभाग R मांक ५५ ‘अ’ मध्ये शिवसेनेच्या पुजा संदीप करसुळे- गवारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर भाजपने कल्पना गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढतील हे स्पष्ट झाले आहे.

ठाणे महापालिकेत दोन्ही पक्षात युती असल्याने शिवसेनेने कळव्याची जागा भाजपला सोडायला हवी होती. युतीचा फॉम्युला साडेचार वर्षांपुर्वीचा आहे. त्यावेळी कळव्याची जागा भाजपने लढवली होती. अवघ्या ७६ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे शिवसेनेने ही जागा भाजपला सोडून युतीधर्म पाळायला हवा होता. मात्र, शिवसेनेने तो पाळला नाही त्यामुळे आम्ही उमेदवार उभा केला आहे.

संदीप लेले, शहर अध्यक्ष भाजप, ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp fight in thane for election
First published on: 11-08-2016 at 02:05 IST