सरकारची साथ, मात्र भाजपमध्ये नैराश्य

हा निर्णय घेताना राज्य सरकारचा शिवसेनेला डिवचण्याचा हेतू लपून राहिलेला नाही.

tmc
ठाणे महापालिका

नागरी प्रश्नांवरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी असूनही ठाणे भाजपमध्ये शुकशुकाट

महापालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मुंबई, ठाण्यात संधी मिळेल तेथे शिवसेनेची कोंडी करायची अशी खेळी एकीकडे राज्य सरकारकडून खेळली जात असताना ठाण्यात मात्र नागरी प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना िखडीत गाठण्याची संधी असूनही भाजपमध्ये शुकशुकाट दिसू लागल्याने पक्षातील एक मोठा गट कमालीचा अस्वस्थ आहे. ठाणे, कळवा यांसारख्या भागांत खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना तसेच आयुक्त संजीव जयस्वाल यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. गणेश मंडळांना आकारण्यात आलेला दंड, कळव्यातील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र यांसारख्या मुद्दय़ांवरूनही राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. असे असताना दिव्यातील आंदोलनाचा एकमेव अपवाद वगळता शहरातील महत्त्वाच्या मुद्दय़ावर भाजपचे अस्तित्वही जाणवत नसल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेने घेतलेल्या अनेक वादग्रस्त निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटाच नगरविकास विभागाने गेल्या काही दिवसांपासून लावला आहे. नंदलाल समितीने ठपका ठेवलेल्या एका माजी अभियंत्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास तब्बल आठ वर्षांनी नगरविकास विभागाने नुकतीच मंजुरी दिली. लकी कंपाऊंड येथील बेकायदा इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या श्याम थोरबोले या अधिकाऱ्यास पुन्हा सेवेत घेण्याचा आग्रह धरणाऱ्या शिवसेना नेत्यांना चपराक लगावत यासंबंधीचा ठरावही नुकताच नगरविकास विभागाने विखंडित केला. तसेच कळव्यात मलनिस्सारण प्रकल्पाच्या उभारणीस स्थगिती देत नगरविकास विभागाने तेथेही शिवसेनेला धोबीपछाड दिला. नगरविकास विभागाने घेतलेले हे निर्णय पाहता मिळेल तेथे शिवसेनेची कोंडी करायची अशी स्पष्ट रणनीती भाजपने आखल्याचे दिसून येते.

मुंबईत आंदोलन.. ठाण्यात शुकशुकाट

मुंबईतील खड्डय़ांविरोधात रान पेटवत तेथील भाजप नेत्यांनी शिवसेनेला कात्रजचा घाट दाखविण्याची तयारी सुरू केली आहे. असे असताना ठाण्यात मात्र एकाही नागरी प्रश्नावर भाजप संघटनात्मक पातळीवर आक्रमक होत नसल्याने जिल्ह्य़ातील भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे शहरात खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत आयुक्त संजीव जयस्वाल यांना लक्ष्य केले आहे.कळव्यातील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राच्या उभारणीप्रकरणी राष्ट्रवादीच्या आंदोलनास शासनाच्या निर्णयामुळे बळ मिळाले आहे. हा निर्णय घेताना राज्य सरकारचा शिवसेनेला डिवचण्याचा हेतू लपून राहिलेला नाही. एकीकडे राष्ट्रवादीकडून शिवसेनाविरोधी वातावरण तापवले जात असताना थोरबोलेंसारख्या अधिकाऱ्यास सेवेत घेण्याचा ठराव मंजूर करताना शिवसेनेला साथ देऊन भाजपने मुखभंग केल्याची चर्चा आहे. जयस्वाल यांनी गेल्या वर्षभरात शहरात राबविलेल्या विकासकामांचा राजकीय लाभ मिळविण्यासाठी शिवसेना नेत्यांनी पद्धतशीरपणे वातावरणनिर्मिती केली आहे. मात्र, या आघाडीवरही भाजपचे अस्तित्व जाणवत नसल्याचे एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे वृत्त आहे.

दिवा हा ठाणे महापालिकेचा एक भाग असून त्या ठिकाणी विविध नागरी प्रश्नांवर भाजप कार्यकर्त्यांचे जोरदार आंदोलन सुरू आहे. ठाणे शहरात फारसे खड्डे नसताना या मुद्दय़ावरून प्रसिद्धी मिळविण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा ठाणेकरांना स्वस्त भाजी केंद्रासारखी सुविधा मिळवून देण्यात पक्ष म्हणून आम्हाला स्वारस्य आहे. शिवाय शहरात होणाऱ्या दोन पोटनिवडणुका आम्ही शिवसेनेविरोधात लढवीत आहोत, हे लक्षात घ्यायला हवे.

– संदीप लेले, शहर अध्यक्ष, भाजप

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena bjp issue in thane