शिवसेना नगरसेवक भाजपमध्ये दाखल

भाजपची विधानसभा निवडणूक तयारी सुरु

(संग्रहित छायाचित्र)

भाजपची विधानसभा निवडणूक तयारी सुरु

भाईंदर : लोकसभा निवडणूकीसाठी भाजप आणि शिवसेनेत युती झाली असली तरी मीरा भाईंदरच्या स्थानिक पातळीवर मात्र ही युती फक्त कागदावरच राहीली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात असल्या पेणकरपाडा या परिसरातील शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांना फोडून भाजपने आपल्या पक्षात सामील करुन घेतले आहे. या खेळीवरुन लोकसभेसोबतच भाजपने स्थानिक पातळीवर विधानसभा निवडणूकीची देखील तयारी सुरु केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०१७ मध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणूकीत अनिता पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन शिवसेनेत प्रवेश केला आणि पेणकरा पाडा येथून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या. परंतू अवघ्या दीड वर्षांतच त्यांनी शिवसेनेला देखील जय महाराष्ट्र करुन नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. पेणकर पाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही अनिता पाटील शिवसेनेत जाण्याआधी या भागातून सलग तीन वेळा राष्ट्रवादीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांची ही वैयक्तिक ताकद ओळखुनच भाजपने त्यांना जवळ केले आहे. ठाणे लोकसभा मतदरासंघ युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. याठिकाणाहून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे पुन्हा युतीकडून निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे अनिता पाटील यांच्या भाजप प्रवेशाने लोकसभा निवडणूकीच्या गणितावर काहीही परिणाम होणार नाही. परंतू  त्यांच्या भाजप प्रवेशाने आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपला मात्र लाभ होणार आहे.

भाजप शिवसेनेमधील युती विधानसभा निवडणूकीतही कायम राहील असे वरिष्ठ पातळीवर नक्की करण्यात आले असले तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि सेनेत फारसे सख्य नाही. किंबहूना शिवसेने सोबत युती नको अशीच इच्छा इथल्या भाजप नेत्यांची आहे.  मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नरेंद्र मेहता हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकीतही हा मतदारसंघ भाजपच्या वाटय़ाला जाणार आहे. या निवडणूकीत शिवसेनेचे पदाधिकारी भाजपला कितीपत मदत करतील याची भाजप नेतृत्वाला शंका आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या मतदारसंघाची बांधणी आतापासूनच करायला सुरुवात केली असल्याचे अनिता पाटील यांच्या भाजप प्रवेशावरुन स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच नयानगर मधील काँग्रेस पुरस्कृत नगरसेवक अमजद शेख यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रभाग देखील मीरा भाईंदर विधानसभा मतदरासंघात येतो. त्यापाठोपाठ भाजपने शिवसेनेच्या अनिता पाटील यांना पक्षात प्रवेश दिला आहे. भाजपच्या या सर्व हालचालींवरुन लोकसभा निवडणूकीसोबतच भाजपने विधानसभा निवडणूकीची मोर्चेबांधणी आतापासूनच सुरु केली असल्याचे उघड झाले आहे.

मीरा-भाईंदर विधानसभा स्थिती मजबुतीसाठी प्रयत्न

अनिता पाटील नगरसेविका असलेला पेणकरपाडा प्रभाग मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात येतो. पेणकरपाडा प्रभागातून सध्या शिवसेनेचे तीन आणि भाजपचा एक असे नगरसेवक निवडून गेले आहेत. त्यामुळे या प्रभागात आपली स्थिती मजबूत करण्यासाठीच भाजपने पाटील यांना पक्षात घेण्याची चाल खेळली आहे. येत्या काही दिवसात शिवसेनेचे आणखी काही नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena corporator join bjp in mira bhayander