डोंबिवली – डोंबिवली जवळील ठाकुर्ली, चोळेगाव हद्दीत शिवसेनेचे युवा प्रदेश सचिव दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचे राजकीय किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक रस्त्यांवर लावण्यास सक्त मनाई करण्याचा निर्णय चोळेगाव ग्रामस्थांनी घेतला आहे. शनिवारपासून अशा सक्त मनाईचे आदेश ठाकुर्ली, चोळेगाव हद्दीत मुख्य रस्ते, चौकांमध्ये झळकत आहेत.
शिवसेनेचे युवा सेनेचे प्रदेश सचिव, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे शिवसेने शिंदे गटातून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू आहेत. या विषयांवरून दीपेश म्हात्रे यांचे नवरात्रोत्सव किंवा राजकीय फलक डोंबिवली शहराच्या विविध भागात लावण्यात येत आहेत. अशाच प्रकारचे फलक ठाकुर्ली, चोळेगाव, ९० फुटी रस्ता भागात लावण्याचा प्रकार घडला.
हेही वाचा >>>पंतप्रधानांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची छाप
दीपेश यांचे वडील माजी महापौर पुंडलिक म्हात्रे आणि चोळेगाव, खंबाळपाडा येथील काही ग्रामस्थांमध्ये जुना वाद आहे. या पूर्ववैमनस्य वादातून दिपेश म्हात्रे यांचे फलक चोळेगाव, खंबाळपाडा, ठाकुर्ली परिसरात न लावण्याचा निर्णय चोळेगाव परिसरातील ग्रामस्थांनी घेतला गेला असण्याची चर्चा ठाकुर्ली परिसरात आहे. या फलकबाजीमुळे चाळीस वर्षापूर्वीचा पूर्ववैमनस्यातील वाद पुन्हा चर्चेत आला असल्याची चर्चा शहरात आहे.
हेही वाचा >>>Narendra Modi In Thane : महाविकास आघाडी विकासाचा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकास्त्र
डोंबिवलीत सार्वजनिक नवरात्रोत्सव विविध मंडळांकडून साजरा केला जात आहे. यामधील बहुतांशी मंडळांना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद आहे. या मंडळांच्या मंडपांबाहेर दीपेश म्हात्रे यांचे नवरात्रोत्सव मंडळांना शुभेच्छा देणारे फलक म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. पण यावरून राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता विचारात घेऊन बहुतांशी नवरात्रोत्सव मंडळांनी दीपेश म्हात्रे यांचे मंडपांवरील फलक स्वताहून काढून टाकल्याची माहिती नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.
(ठाकुर्ली, चोळेत दीपेश म्हात्रे यांचे फलक लावण्यास बंदी.)